
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पुण्याशी संबंधित संरक्षण खात्याकडील अनेक प्रलंबित विषयांवर सविस्तर चर्चा झाली. पुणे विमानतळ विस्तार, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डांचे महानगरपालिकेत विलीनीकरण आणि इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना बजावलेल्या नोटीसा या प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा होऊन, विषय मार्गी लावण्यासंदर्भात कार्यवाहीचे निर्देश संरक्षण मंत्र्यांनी दिले आहेत. नवी दिल्लीतील संरक्षण खात्याच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी प्रामुख्याने पुणे विमानतळाच्या विस्ताराचा मुद्दा मांडला. विमानतळाच्या पुढील विस्तारासाठी एकूण ३०० एकर जागा संपादित केली जाणार आहे, जी राज्य सरकार स्वतः संपादित करेल. सध्या, भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या टर्मिनलला लागून हवाई दलाची ३५ एकर जागा आहे. राज्य सरकारने या ३५ एकर जागेच्या बदल्यात हवाई दलाला त्याच परिसराला लागून ६५ एकर जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत हवाई दलाला आवश्यक निर्देश दिल्यास विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू होऊ शकेल, अशी विनंती मोहोळ यांनी केली. पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पुणे महानगरपालिकेत विलीनीकरण करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या दोन्ही कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या जमिनी महापालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने एप्रिल २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकारकडून लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही व्हावी, अशी मागणी मोहोळ यांनी यावेळी केली. लोहगाव येथील इंदिरानगर-बर्मा शेल वसाहतीतील नागरिकांना हवाई दलाने जागा रिकामी करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. सुमारे पाच एकरच्या या परिसरात ११०० ते ११५० घरे असून, जवळपास ५५०० ते ६००० नागरिक १९८० पासून येथे वास्तव्यास आहेत. या भागात महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालय आणि इतर अनेक नागरी सुविधा देखील उपलब्ध आहेत. यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्येही मंत्री मोहोळ यांनी या समस्येकडे संरक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले होते. या प्रकरणात संरक्षण खाते आणि महापालिकेने समन्वयातून मार्ग काढण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या सर्व विषयासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. यामुळे गेली काही महिने प्रलंबित असणाऱ्या या विषयांना गती मिळण्याची शक्यता आहे. पुण्याच्या विकासाशी आणि नागरिकांच्या हिताशी संबंधित संरक्षण खात्याचे अनेक महत्त्वाचे विषय गेल्या काही काळापासून प्रलंबित होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जी यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. पुणे विमानतळ विस्तार, कॅन्टोन्मेंट विलीनीकरण आणि इंदिरानगरमधील नागरिकांच्या प्रश्नांबाबत लवकरच ठोस निर्णय होऊन प्रश्न मार्गा लागतील, असा विश्वास आहे. – मुरलीधर मोहोळ
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
