
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोमूत्र शिंपडल्याच्या घटनेवरून माने यांनी ‘भाजप कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेंदूवर गोमूत्र शिंपडावे,’ असे म्हटले आहे. पुणे येथे बोलताना सुनील माने यांनी सांगितले की, भाजप किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी गोमूत्र शिंपडून आपली वैचारिक दारिद्रता दाखवून दिली आहे. ही कृती म्हणजे भाजपच्या वैचारिक दिवाळखोरीचे प्रदर्शन असून, अशा कृतीने कोणतीही जागा शुद्ध किंवा पवित्र होत नाही, असेही ते म्हणाले. माने यांनी स्पष्ट केले की, सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अत्यंत फसवी असल्याने रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे लागले. सरकारच्याच आकडेवारीनुसार ही कर्जमाफी फसवी असल्याचे स्पष्ट होते. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला ९९ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफीचा कोणताही तोटा होणार नाही असे म्हटले होते. नंतर लोकांच्या आंदोलनानंतर त्यांनी ७० टक्के लोकांना तोटा होणार नाही असे सांगितले. मात्र, सरकारच्या आकडेवारीनुसार प्रत्यक्षात ७० टक्के शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांसाठी रोहित पवार यांनी पंढरपूर येथे आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाला अनेक शेतकरी नेते, विविध शेतकरी संघटना तसेच शेतकरी बंधू-भगिनींनी प्रत्यक्ष भेटून आणि विविध माध्यमांतून पाठिंबा दिला. वास्तविक, भारतीय जनता पक्षाच्या किसान संघाने शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी उलटपक्षी गोमूत्र शिंपडून आंदोलन स्थळ ‘पवित्र’ करण्याचा प्रयत्न केला. सुनील माने यांनी या कृतीचा कडक शब्दांत निषेध केला. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या अटी मागे घेण्याचे आश्वासन दिले, हेच रोहित पवार यांनी केलेल्या आंदोलनाचे यश आहे. त्यामुळेच काही लोकांना पोटशूळ उठला असावा, असेही माने यांनी नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
