
अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे मंगळवार, ३० जून रोजी अनुसूचित जाती (SC) संवर्गातील ५९ जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. आंदोलकांनी सरकारचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चाची सुरुवात शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाली. आंदोलनाच्या शेवटी, राष्ट्रपतींना उद्देशून एक निवेदन तिवसा तहसीलदारांमार्फत पाठवण्यात आले. जिल्हा स्तरावर स्थापन झालेल्या उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांचा आरोप आहे की, केंद्र आणि राज्य सरकार उपवर्गीकरणाच्या नावाखाली जातींमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. अनुसूचित जाती संवर्गातील ५९ जातींना सध्या १३ टक्के आरक्षण मिळते. उपवर्गीकरणामुळे हे आरक्षण धोक्यात येईल, असा आंदोलकांचा दावा आहे. कोणत्याही परिस्थितीत हे उपवर्गीकरण हाणून पाडणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारच्या धोरणांविरोधात समाज बांधव यावेळी आक्रमक दिसून आले. या आंदोलनात नगरसेवक अनिल थूल, प्रशांत कांबळे, संदीप चक्रनारायण, सागर भवते, आशीष ढोले, जानराव मनोहर, राजेंद्र शेंडे, भारत दाहाट, दिलीपराव जवंजाळ, शरद वानखडे, देवदत्त खोंडे, संदीप दाहाट, पुरुषोत्तम मेश्राम, संदीप हगवणे, धम्मराज खडसे, नितीन थोरात, सचिन जोगे, अमोल जवंजाळ, प्रकाश सोनोने, प्रशिक मकेश्वर, प्रकाश चिंचखेडे, यश ठाकरे, रामभाऊ मनोहर, मनिष खरे, राहुल मकेश्वर, मनोज खाकसे, प्रवीण निकाळजे, रोहित गवई, विकास मुन्द्रे, मनिष माहोरे, सुमित शेंद्रे, पंकज गडलिंग, सुनील रामटेके, मदन गायकवाड यांच्यासह समता सैनिक दलाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यासह राज्यात उपवर्गीकरण विरोधात तिवसा तालुक्यात पहिल्यांदाच तालुकास्तरीय एल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात काही चिमुकले महापुरुषांची वेशभूषा करून सहभागी झाले होते. या चिमुकल्यांच्या हस्ते तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
