
पुण्यातील खडकी परिसरातील महादेववाडी येथे जुन्या वादातून एका कुटुंबावर लोखंडी हत्यारे आणि दगडांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खडकी पोलिसांनी ‘चांदणे गँग’चा मुख्य आरोपी अनिकेत चांदणे, त्याच्या टोळीतील 10 तरुण आणि 3 अज्ञात तरुणींविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. तक्रारदार सुभाष बाबू संगेला यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घराजवळ भांडण सुरू होते. संगेला यांची पत्नी अनू आणि मुलगी प्रीत यांना तीन अज्ञात तरुणी मारहाण करत असल्याचे पाहून संगेला यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या अनिकेत चांदणे याने फोन करून आपल्या इतर साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. थोड्याच वेळात अनिकेत चांदणे, सागर चांदणे, आकाश चांदणे, यश गोपनारायण, सलमान शेख, नकुल गायकवाड, राहुल विघ्नेश्वर, कुबेर लखखन, बाब्या ऊर्फ राज सोनार आणि अनिकेत पठारे हे सर्वजण लोखंडी हत्यारे आणि दगडांसह घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी मिळून संगेला कुटुंबावर हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादीचे चुलत भाऊ राहुल राम पिवाल यांच्या डोक्यावर लोखंडी हत्याराने गंभीर वार करण्यात आले, ज्यामुळे ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या त्यांची पत्नी भारती पिवाल आणि तक्रारदार सुभाष संगेला यांच्यावरही आरोपींनी हल्ला केला. हल्ल्यादरम्यान आरोपींनी हवेत हत्यारे फिरवून परिसरात दहशत निर्माण केली. यामुळे घाबरलेल्या स्थानिक नागरिकांनी आपल्या घरांची दारे आतून बंद करून घेतली. ‘खडकीमध्ये फक्त चांदणे गँगचेच राज्य चालणार!’ अशी घोषणाबाजी करत आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खडकी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
