
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सहकुटुंब संत तुकाराम महाराजांच्या पावन नगरी देहूला भेट देत पालखी सोहळ्याच्या सेवेत सहभाग नोंदवला. संत तुकाराम महाराजांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाच्या कळसासाठी पवार कुटुंबाच्या वतीने 11 किलो चांदी अर्पण करण्यात आली. ही चांदी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात देहू संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात आली. चांदी अर्पण केल्यानंतर रोहित पवार यांनी सहपरिवार श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले तसेच संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. संस्थानच्या आवाहनाला पवार कुटुंबाचा प्रतिसाद जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नवीन चांदीच्या पालखी रथाच्या संपूर्ण कळसासाठी चांदी दान करण्याचे आवाहन देहू संस्थानने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत पवार कुटुंबाने ही सेवा केली. याप्रसंगी रोहित पवार यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार, वडील राजेंद्रदादा पवार, पत्नी कुंती पवार, काका रणजित पवार, काकू शुभांगी पवार, सासरे सतीशदादा मगर, सासूबाई रेखा मगर, सईताई, मुलगी आनंदिता आणि मुलगा शिवांश उपस्थित होते. संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख विक्रमसिंह मोरे महाराज, वैभव महाराज मोरे आणि उमेश महाराज मोरे यांच्याकडे ही चांदी सुपूर्द करण्यात आली. “ही सेवा कोणत्याही अपेक्षेपोटी नाही” – रोहित पवार या निमित्ताने संस्थानचे अध्यक्ष यांना लिहिलेल्या पत्रात रोहित पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला समता, बंधुता, मानवता, भक्ती आणि सदाचाराची दिशा देणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या विचारांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी आणि वारकरी परंपरेप्रती निष्ठा जपण्यासाठी ही सेवा करण्यात आली आहे. ही चांदी कोणत्याही अपेक्षेपोटी नव्हे, तर संतांच्या कार्याविषयी असलेल्या श्रद्धेतून अर्पण करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पाहा याप्रसंगीचे फोटो… “तुकोबारायांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली” रोहित पवार यांनी आपल्या पत्रात संत तुकाराम महाराजांच्या कार्याचा उल्लेख करत शेतकरी प्रश्नालाही स्पर्श केला आहे. ते म्हणाले की, “जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी करून अन्नदात्याला कर्जमुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा देत आहोत.” संतांचा विचार समाजात अधिक रुजावा आणि वाढावा, हीच पवार कुटुंबाची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अध्यात्मिक सेवेची परंपरा कायम पत्रात रोहित पवार यांनी पवार कुटुंबाने यापूर्वी केलेल्या विविध धार्मिक आणि सामाजिक सेवांचाही उल्लेख केला आहे. कोविड काळात राज्यातील विविध धार्मिक स्थळांना सॅनिटायझरचे वाटप, श्रीक्षेत्र अरण येथे संत सावता महाराजांच्या समाधीस्थळी भक्तनिवास उभारणीसाठी मदत, कर्जत येथे संत गोदड महाराजांच्या समाधीसाठी चांदीची मेघडंबरी, तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर येथे भाविकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासारख्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे…’ पत्रात संत तुकाराम महाराजांची प्रसिद्ध ओवी— “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी” याचा उल्लेख करत रोहित पवार यांनी सांगितले की, मेहनतीने कमावलेल्या उत्पन्नातून देहू संस्थानच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे सेवाकार्य करण्यात आले आहे. पत्राच्या शेवटी रोहित पवार यांनी आपल्या कुटुंबाच्या कृषी क्षेत्रातील कार्याचाही उल्लेख केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, कृषीरत्न स्वर्गीय डॉ. अप्पासाहेब पवार यांच्यापासून सुरू झालेली शेती आणि शेतकऱ्यांप्रतीची बांधिलकी आजही राजेंद्रदादा पवार आणि स्वतः त्यांच्या माध्यमातून कायम आहे. शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी संशोधन, आधुनिक शेती, नवीन तंत्रज्ञान, प्रशिक्षण, शेतीपूरक उद्योग आणि देशातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनासारखे अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. या सेवेमुळे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या कार्याला संत तुकाराम महाराजांचे आशीर्वाद लाभावेत आणि “राम कृष्ण हरी”चा अखंड गजर समाजात निनादत राहावा, अशी प्रार्थनाही त्यांनी पत्राच्या शेवटी व्यक्त केली. अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विश्वस्त दिनकर शास्त्री भुकेले, पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे विश्वस्त माऊली महाराज जळगावकर, रमेश महाराज वसेकर, साहेबराव महाराज सौदागर, संदीप रवींद्र पाटील, कैलास महाराज भोरे, आत्माराम शास्त्री जाधव, शामसुंदर सोन्नर महाराज, दत्ता महाराज दोन्हे पाटील, मोहनानंद महाराज पुरंदावडेकर, विठ्ठल भालेकर, समाधान महाराज देशमुख, सुधाकर पाटील तराळे यांच्यासह आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक पदाधिकारी, वारकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
