
आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील ‘चरणसेवा’ उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे 400 मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, 12 हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे 3 हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर 8 आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती, स्वच्छतेचे महत्त्व, संसर्गजन्य व पावसाळ्यातील आजारांपासून बचाव, निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक मार्गदर्शन वारकरी व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. निवडक ठिकाणी योगसत्रांचेही आयोजन करण्यात आले आहे. 1 लाख 75 हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरणसेवा कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गतवर्षी ‘चरणसेवा’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून 1 लाख 75 हजारांहून अधिक वारकऱ्यांना थेट चरणसेवा, वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या, तर 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचविण्यात आला. 400 सेवा केंद्रांवर 12 हजारांहून अधिक डॉक्टर यंदा 11 जिल्ह्यांतील सुमारे 400 सेवा केंद्रांवर 12 हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, 3 हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका सेवा आणि 8 आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूपात सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक वारकऱ्यांपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ या संकल्पनेवर आधारित ‘चरणसेवा’ उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने सर्व वारकरी, दिंडी प्रमुख आणि पालखी मार्गावरील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
