
ज्येष्ठ कवी व साहित्यिक शिवा इंगोले यांच्या “अक्षराचा तिसरा डोळा” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबईत पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटर्स असोसिएशनच्या वतीने साहित्यिक बाबुराव बागुल यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. अनिल सकपाळ यांनी सांगितले की, “कवी हा संस्कृतीला प्रश्न विचारतो. त्यामुळेच भारतीय तत्त्वज्ञानाचा जो संघर्ष आहे, तो समजून घेतला पाहिजे.” ते पुढे म्हणाले की, शिवा इंगोले यांची कविता माणसांच्या तत्त्वज्ञानावर बोलते आणि माणसांचा शोध घेते. त्यांची संपूर्ण कविता बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार व अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. मुणगेकर यांनी शिवा इंगोले यांच्या कवितेतील पौराणिक संदर्भांचा समर्पक वापर आणि बाबुराव बागुल यांच्या साहित्य प्रतिमेशी असलेले नाते अधोरेखित केले. प्रगल्भ साहित्यिक हा जीवनाचा खरा भाष्यकार असावा लागतो, असेही ते म्हणाले. मूळ अमरावतीकर असलेले कवी शिवा इंगोले यांच्या साहित्यातून नेहमीच विद्रोही विचार, मानवी मूल्ये आणि सामाजिक समतेचा पुरस्कार केला गेला आहे. दलित, शोषित व पुरोगामी चळवळीचा मोठा वारसा लाभलेल्या अमरावती जिल्हयातून आलेल्या इंगोले यांनी ‘अक्षराला’ विवेकाचा ‘तिसरा डोळा’ मानून व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे काम या संग्रहातून केले आहे. या सोहळ्याला माजी न्यायाधीश डी. के. सोनवणे, प्रा. रामप्रसाद तोर आणि प्रा. कुसुम त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. असोसिएशनचे सचिव ॲड. नाना अहिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सुधाकर सरोदे यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रदीप नाईक यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला मुंबई व विदर्भातील अनेक रसिक व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/