
पेट्रोलमधील इथेनॉलच्या वाढत्या मिश्रणामुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारींवरून संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. युट्यूबर्स, सोशल मीडियावरील मिम्स आणि नेटीझन्सकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना टार्गेट केले जात असताना, आता या वादात राजकीय ठिणगी पडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. अनिवार्य इथेनॉल-मिश्रित इंधनामुळे लाखो भारतीयांचे नुकसान होत असून, ग्राहकांना ‘१०० टक्के शुद्ध पेट्रोल’ आणि ‘इथेनॉलमिश्रित पेट्रोल’ असा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी मध्यमवर्गीय आणि तरुण वाहनधारकांच्या व्यथा मांडल्या आहेत. आदित्य ठाकरे पत्रात म्हणतात, “देशातील बहुतांश कुटुंबांसाठी दुचाकी किंवा चारचाकी खरेदी करणे ही चैनीची गोष्ट नसून, अनेक वर्षांच्या बचतीतून आणि दीर्घकालीन कर्जाचे (EMI) हप्ते फेडून घेतलेले स्वप्न असते. मात्र, इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यापासून वाहनांचे मायलेज प्रचंड घटले असून इंजिनच्या कामगिरीवरही विपरीत परिणाम झाला आहे. रस्त्यावर धावणाऱ्या बहुतांश जुन्या वाहनांची रचना (Design) जास्त इथेनॉल मिश्रित इंधनासाठी केलेली नाही. त्यामुळे कोणताही पर्याय न ठेवता केंद्र सरकारने हे धोरण सक्तीने जनतेवर लादल्याची भावना निर्माण झाली आहे.” पाणीटंचाई आणि विशिष्ट औद्योगिक गटांचा फायदा? इथेनॉल निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जाणाऱ्या ऊस लागवडीवरही आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवले आहे. ते म्हणाले, “ऊस हे देशातील सर्वाधिक पाणी लागणाऱ्या पिकांपैकी एक आहे. देश आधीच गंभीर पाणीटंचाईचा सामना करत असताना, इथेनॉलसाठी अमर्याद ऊस पिकवणे किती शाश्वत आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत. हे इंधन धोरण सर्वसामान्य नागरिकांपेक्षा काही विशिष्ट कंपन्या आणि औद्योगिक गटांच्या फायद्यासाठी राबवले जात असल्याची सार्वत्रिक धारणा बनली आहे. या शंकांचे सरकारने पारदर्शकपणे निरसन करणे गरजेचे आहे.” ग्राहकांना इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य द्या! जगातील अनेक प्रगत देशांचे उदाहरण देत आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे उपाययोजना सुचवली आहे. ” पेट्रोल पंपांवर ‘१००% शुद्ध पेट्रोल’ आणि ‘इथेनॉल-मिश्रित इंधन’ असे दोन्ही पर्याय स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जावेत. ज्या वाहनांची क्षमता इथेनॉल मिश्रित इंधनाची आहे, ते ग्राहक ते इंधन वापरू शकतील; तर इतरांना नियमित शुद्ध पेट्रोल घेण्याचा अधिकार असावा. यामुळे लाखो वाहनधारकांची गैरसोय टळेल, इंधनावरील जनतेचा विश्वास वाढेल आणि कष्टकरी मध्यमवर्गाला दिलासा मिळेल,” असा विश्वास व्यक्त करत या पत्रावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. हे ही वाचा… रायपूरमध्ये E-20 पेट्रोल टाकल्याने इंजिन खराब:ग्राहक न्यायालय म्हणाले- मारुती सुझुकीने नवी कार किंवा 20 लाख परत द्यावे; देशातील पहिले प्रकरण देशभरात पेट्रोलमध्ये E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित इंधन) च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याच दरम्यान रायपूरमध्ये E20 पेट्रोलमुळे कारचे इंजिन खराब झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या संबंधित प्रकरणात ग्राहक न्यायालयाने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि तिच्या अधिकृत डीलरला जबाबदार धरले आहे. न्यायालयाने सांगितले की, नवीन कार द्यावी किंवा 20 लाख रुपये परत करावेत. सविस्तर बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
