
वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी 23 वर्षांच्या मुलाने साथीदारांच्या मदतीने एकाचा थरारक खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांच्या संयुक्त पथकाने चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. संजय बाबूराव कडू-देशमुख (वय 40, रा. मुंढवा, पुणे; मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी (दोघे रा. जोशी वाडा, सदाशिव पेठ), मिझान गौसउद्दीन शेख आणि संदीप बाबुलाल कौरी (दोघे रा. पर्वती दर्शन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. काय आहे प्रकरण? पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने भीषण वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून ग्रामीण पोलिसांचे पथक समांतर तपास करत होते. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी मिझान शेख आणि संदीप कौरी यांच्या मदतीने हा खून केल्याची कबुली दिली. बदल्याच्या भावनेतून हत्याकांड चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी मंथन वैद्य याचे वडील दिनेश वैद्य यांचा 2023 मध्ये संजय देशमुख यांनी खून केला होता. तेव्हापासून मंथन हा वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत होता. अखेर 23 व्या वर्षी त्याने मित्रांच्या मदतीने कट रचून संजय देशमुख यांचा काटा काढला. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कारवाई करत चारही आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून हत्यारांसह पिस्तूल व काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास राजगड पोलिस करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.