
नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर गंभीर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात पैसे उकळल्यापासून महिला विद्यार्थिनींच्या सन्मानाला धक्का पोहोचवणाऱ्या घटनांची ‘एनएसयूआय’ने पोलखोल केली आहे. महाविद्यालयातील स्वच्छतागृहात डस्टबिनची व्यवस्था नसल्यामुळे एका विद्यार्थिनीने वापरलेला सॅनिटरी पॅड कागदात गुंडाळून बाजूला ठेवला होता. त्यानंतर हा प्रकार कोणी केला हे शोधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीची हात लावून तपासणी केल्याचा गंभीर प्रकारही घडला. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’ने राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. सदर प्रकरणी आम्ही MKD कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थाचलाकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही. दरम्यान, या प्रकरणी संबंधित प्रशासनानेही आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. ‘एमकेडी’ महाविद्यालयात शिकणाऱ्या आदिवासी तसेच सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर आर्थिक दबाव टाकला जात असल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नसल्याची भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांचे कथित बेकायदेशीर डोनेशन घेतले जात असल्याचे विद्यार्थ्यांनी ‘एनएसयूआय’च्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. विशेष म्हणजे एवढी मोठी रक्कम घेतल्यानंतरही कोणतीही अधिकृत पावती दिली जात नसल्यामुळे या व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही या निवेदनातून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर गंभीर परिणाम महाविद्यालयाच्या प्रशासकीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. पहिल्या वर्षात विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयाचे ओळखपत्र देण्यात आले, तर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या संस्थेचे ओळखपत्र दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमके कोणत्या संस्थेत शिक्षण घेत आहेत, त्यांची नोंद कोणत्या महाविद्यालयात आहे आणि पदवी कोणत्या संस्थेच्या नावाने मिळणार, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विसंगतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या मूलभूत अधिकारांचा भंग महिला विद्यार्थिनींसंदर्भातील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे ‘एनएसयूआय’ने म्हटले आहे. महाविद्यालयातील स्वच्छतागृहात डस्टबिनची व्यवस्था नसल्यामुळे एका विद्यार्थिनीने वापरलेला सॅनिटरी पॅड कागदात गुंडाळून बाजूला ठेवला होता. त्यानंतर हा प्रकार कोणी केला हे शोधण्यासाठी प्रत्येक विद्यार्थिनीची हात लावून तपासणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या गोपनीयतेचा, सन्मानाचा आणि मूलभूत अधिकारांचा भंग झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महिला विद्यार्थिनींना अशा प्रकारे वागवणे अत्यंत अमानवी आणि अस्वीकार्य असल्याचेही ‘एनएसयूआय’ने स्पष्ट केले आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन या घटनेनंतर विद्यार्थिनींना शिक्षा म्हणून दिवसभर स्वच्छतागृह वापरण्यास बंदी घालण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या दोन विद्यार्थिनींनी वारंवार विनंती करूनही त्यांना शौचालय वापरण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्या रडत असतानाही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचे सांगण्यात आले आहे. अशा प्रकारची वागणूक केवळ विद्यार्थिनींच्या आरोग्याशी खेळ करणारी नसून मानवी हक्कांचे उल्लंघन करणारी असल्याचा आरोप ‘एनएसयूआय’ने केला आहे. या घटनेची स्वतंत्र चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनाच डॉक्टर, नर्स आणि रुग्णांच्या भूमिका महाविद्यालयातील नर्सिंग शिक्षणाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. नर्सिंग महाविद्यालयाला प्रशिक्षणासाठी कार्यरत संलग्न रुग्णालय असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात तसे रुग्णालय उपलब्ध नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एवढेच नव्हे, तर तपासणीसाठी अधिकारी आल्यावर विद्यार्थ्यांनाच डॉक्टर, नर्स आणि रुग्णांच्या भूमिका करून खोटा देखावा उभा केला जात असल्याचाही दावा करण्यात आला आहे. हा प्रकार खरा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी, प्रशिक्षणाशी आणि भविष्यासोबतचा गंभीर खेळ असल्याचे ‘एनएसयूआय’ने म्हटले आहे. पाच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे या कथित गैरप्रकारांविरोधात विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसात सकाळी दहा वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलनानंतर सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या पाच विद्यार्थ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा दावा एनएसयूआयने केला असून हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ‘एनएसयूआय’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी नंदुरबार येथे जाऊन विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच राज्य सरकारकडे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या सोडविण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचेही साळुंखे यांनी नमूद केले आहे. सरकारसमोर मांडल्या ठोस मागण्या ‘एनएसयूआय’ने या प्रकरणात काही ठोस मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून कथितरित्या वसूल करण्यात आलेली संपूर्ण रक्कम परत करण्यात यावी, एमकेडी महाविद्यालय आणि संबंधित संस्थेची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, नियमबाह्य बाबी आढळल्यास संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी, तसेच दोषी संस्था चालक, शिक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थी आणि पालकांना झालेल्या आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक त्रासाबद्दल संस्थेने जाहीर माफी मागावी तसेच आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर दाखल झालेले कथित खोटे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने हस्तक्षेप करावा, अशी विनंती ‘एनएसयूआय’ने निवेदनाद्वारे केली आहे. आदिवासी आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी व भविष्यासोबत तडजोड होऊ नये, यासाठी दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे संघटनेचे मत आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत एनएसयूआय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि हा लढा सुरूच राहील, असा निर्धार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान संबंधित संस्था किंवा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
