
एप्रिल महिन्यातील वाढत्या तापमानामुळे वन्यजीव आणि पक्ष्यांना मोठा फटका बसत आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तिवसा तालुक्यातील वन्यजीवप्रेमी शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी ‘पक्ष्यांसाठी अन्न व पाणी’ हा संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत, त्यांनी मित्रपरिवाराच्या सहकार्याने विविध गावांमध्ये झाडांच्या सावलीत, मोकळ्या जागांमध्ये आणि सुरक्षित ठिकाणी पाण्याची भांडी (परळ) ठेवण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच पक्ष्यांसाठी धान्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या तिवसा आणि अमरावती तालुक्यातील मोझरी, अनकवाडी, मालधुर, ब्राम्हणवाडा गोविंदपूर, शिवणगाव आणि काटपूर या गावांमध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमामुळे अनेक पक्ष्यांना उन्हाच्या तीव्र झळांपासून दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. समाजसेविका सोनिया गुप्ता, तसेच साहिल चावके, पवन भिवगडे, भूषण निकोशे, दर्शन खुळे, आकाश भुयार आणि कुणाल खुळे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला आहे, ज्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक होत आहे. याबाबत बोलताना शुभम विघे आणि सागर अटाळकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा परिसरात लहान पाण्याची भांडी ठेवून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करावी, असे ते म्हणाले. आपल्या छोट्या प्रयत्नातून मोठा बदल घडू शकतो, त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम केवळ काही गावांपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण तालुकाभर राबवण्याचा संबंधितांचा मानस आहे. येत्या काही दिवसांत भटक्या जनावरांसाठीही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर एक पाण्याचे भांडे ठेवल्यास अनेक पशु-पक्ष्यांचे प्राण वाचू शकतात, असा संदेश ही चमू सर्वदूर पोहोचवत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






