
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कालचे भाषण सत्यापासून कोसो दूर होते. महिला आरक्षणाच्या मुद्यावर संसदेत झालेल्या पराभवाचेही भांडवल करून त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपएवढे जगात कुणीही माहीर नसेल, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री देशाला संबोधित केले. त्यात त्यांनी महिला आरक्षणाला विधेयकाला कथित विरोध केल्याप्रकरणी काँग्रेसवर सडकून टीका केली. त्यांच्या या भूमिकेवर आता राजकीय वर्तुळात संमिश्र पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले, पराभवाचंही भांडवल करुन त्यावर राजकीय पोळी भाजण्यात भाजपइतकं माहीर जगात कुणीच नसेल…! सत्यापासून कोसो दूर असलेलं आजचं भाषण म्हणजे कालच्या पराभवाचं भांडवल करुन त्यावर आगामी तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकीत सत्तेचा डाव जिंकता येतो का, यासाठी केलेला एक प्रयत्न दिसतो. या तिन्ही ठिकाणी कमळ काही फुलणार नाहीच, पण एकमात्र खरंय की, आजच्या भाषणात तीन प्रमुख पक्षांचा चार-चार वेळा झालेला उल्लेख ऐकून तमिळनाडूमध्ये DMK, प. बंगालमध्ये TMC आणि उत्तर प्रदेशात सपा-काँग्रेस युतीची सत्ता येणार असल्याचा तर 2029 मध्ये देश INDIA आघाडीला साथ देणार असल्याचा विश्वास अधिक दृढ झाला, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेवरूनही साधला निशाणा रोहित पवार यांनी यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या घसरगुंडीवरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, जगाची चौथी अर्थव्यवस्था बनण्याचा मार्गावर असलेली आपली अर्थव्यवस्था एका वर्षातच सहाव्या क्रमांकावर घसरली असून युके आणि जपानच्या अर्थव्यवस्थेने आपल्याला मागे टाकले आहे. गेल्या वर्षी भारत चौथी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज IMF ने दिला असता संपूर्ण देशभर स्वतःची वाहवा करून घेणारे केंद्र सरकार आज आपला देश पुन्हा सहाव्या स्थानावर घसरल्याच्या IMF च्या अंदाजावर गप्प का आहे ? केंद्र सरकारची धरसोडीची धोरणे त्यांच्या आश्वासनाप्रमाणेच अत्यंत volatile असल्यानेच भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. केंद्र सरकार यामागचे कारण जीडीपी मोजण्याची बदललेली पद्धत सांगत आहे. जेव्हा नवी पद्धत सुरू केली तेव्हा मात्र नव्या पद्धतीमुळे accuracy येईल, अचूक मोजणी करता येईल असे सांगणारे केंद्र सरकार आज जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आपल्या अपयशाचे खापर फोडत आहे, हे दुर्दैवी नाही का ? केंद्र सरकारची चुकीची धोरणे, रुपयाचे सतत होणारे अवमूल्यन, जगात होणारी सततची युद्धे, या युद्धाच्या संदर्भात आपल्या सरकारने घेतलेल्या संदिग्ध भूमिका, जागतिक स्तरावर असलेली मोठी अनिश्चितता आणि त्याहून अनिश्चित असलेली आपल्या सरकारची भूमिका, कच्चे तेल आयातीसाठी असणारे अवलंबित्व, अमेरिकेने केलेला एकत्तर्फी आणि भारतासाठी मारक असलेला व्यापारी करार आणि एकंदरीतच जागतिक पटलावर केंद्र सरकारकडून आवश्यक असलेल्या डिप्लोमसीचा अभाव यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर हा परिणाम झाल्याचं स्पष्ट असून सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे. असो, केंद्र सरकारला वेळेत जाग येईल ही अपेक्षा, असे ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






