
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतानाच आज सायंकाळी 8 च्या सुमारात वारजे परिसरात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. येथील एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात हल्लेखोरांनी अचानक घुसून गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या घटनेमुळे पुण्यातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. वारजे परिसरातील या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी वेगवान हालचाली करत एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले आहे. सायंकाळच्या वेळी परिसरात मोठी गर्दी असतानाच हा थरार घडला. धक्कादायक म्हणजे, गोळीबार करत असताना बंदूक तरुणाच्या हातातच फुटल्याने तो स्वतःही जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करून गुन्ह्यामागील मूळ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुण्यातील गोळीबाराच्या घटनांनी यापूर्वीही शहराला हादरवून सोडले आहे, मात्र आज भरवस्तीत आणि रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याआधीच्या बहुतांश घटना गँगवॉर किंवा टोळीयुद्धातून घडल्याचे समोर आले होते, त्यामुळे आजचा हा थरारही त्याच संघर्षाचा भाग आहे का, हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. याप्रकरणी पुणे पोलीस आता काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, भविष्यात अशा हिंसक घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अधिक ठोस आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






