
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले. या विरोधात रिपब्लिकन पक्ष (रिपाइं) देशभरात काँग्रेसविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. आठवले यांनी स्पष्ट केले की, केंद्र सरकारने महिलांना आरक्षण दिल्यामुळे देशभरात लोकसभेच्या जागा वाढणार होत्या. नियमानुसार, दक्षिण आणि उत्तर दोन्हीकडील राज्यांच्या जागा समसमान वाढणार होत्या, त्यामुळे कोणत्याही राज्याला झुकते माप देण्याचा प्रश्नच नव्हता. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहार यांसारख्या मोठ्या राज्यांमध्ये त्यांच्या सध्याच्या जागेनुसार जागा वाढल्या असत्या. हे सर्व माहीत असतानाही, केवळ सत्ताधारी पक्षांना याचा फायदा होईल या एकाच भावनेपोटी महिलांना आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले, असा आरोप रामदास आठवले यांनी केला. या प्रकरणी रिपाइंच्या माध्यमातून देशभरात महिलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना आठवले म्हणाले की, राज्यात रिपाइंला एक विधान परिषद सदस्य (MLC) आणि दोन महामंडळांची अध्यक्षपदे राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिपाइंला जागा न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही सरकारने महामंडळांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे महामंडळांचा कालावधी निघून जात असून कार्यकर्त्यांना संधी मिळत नसल्याचे आठवले यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण इंगळे, युवक उपाध्यक्ष शरद शेगावकर, महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक अध्यक्ष पप्पू कागदे, मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, राज्य उपाध्यक्ष ब्रह्मानंद चवहाण, राज्य उपाध्यक्ष दौलत खरात, गजानन बागुल, संतोष सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






