
भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या उल्लेखनीय कामगिरीवरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. विरोधक हे डरपोक, बहाणेबाज व रडके लोक आहेत. त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही. त्यामुळे मी त्यांचे नाव रडके असे ठेवतो. त्यांना थोडी जरी अक्कल असेल, तर त्यांनी आत्मचिंतन करावे, असे ते म्हणालेत. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पश्चिम बंगाल, पद्दुचेरी व आसाम या 3 राज्यांत विजय होण्याची शक्यता आहे. मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणी मतदारांसह या राज्यांतील भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, संपूर्ण देशात भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व व त्याचा जल्लोष दिसून येत आहे. मी सर्वच मतदारांचे आभार मानतो. या निवडणुकीत कष्ट घेणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचेही मी आभार मानतो. विशेषतः केरळ व पश्चिम बंगाल येथील आमच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केले. त्यांनी सर्व आव्हानांवर मात करून आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांनी एका दृढसंकल्पाने पक्षाचे काम केले. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर भारताने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष नितीन नबीन व त्या राज्यांच्या नेत्यांनी जे परिश्रम घेतले, त्यासाठीही मी त्यांचे आभार मानतो. विरोधकांचे एसआयआरवरील दावे फेटाळले आशिष शेलार यांनी पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयात एसआयआरचा मोठा हात असल्याचा विरोधकांचा आरोपही फेटाळून लावला. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरची भूमिका होती, तर केरळात काय होते? विरोधकांनी सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहावे. पश्चिम बंगालमध्ये एसआयआरचा बहाणा देत असतील, तर केरळातील निकालाला काय म्हणता? हे बहाणेबाज लोक आहेत. त्यांना वस्तुस्थितीचा सामना करता येत नाही. खरे हे आहे की, भाजप, एनडीए व पंतप्रधान मोदी हेच जनतेचा कौल व त्यांच्या मनाचे नेतृत्व करतात, असे शेलार म्हणाले. विरोधक हे डरपोक, बहाणेबाज व रडणारे लोक आहेत. त्यांना स्वतःचा पराभव पचवता येत नाही. त्यामुळे त्यांचे नाव मी रडके असे ठेवतो. त्यांना थोडी जरी अक्कल असेल, तर त्यांनी या पराभवाचे आत्मचिंतन करावे. मी मागेही म्हटले होते, जो – जो उबाठा सेनेमध्ये गेला, तो – तो हरला. त्यांचे राजकीय पानिपत झाले. तामिळनाडूतही उबाठा सेना स्टॅलिनची बाजू घेत होते. पण त्यांचा पराभव झाला. त्यांनी ममता बॅनर्जींना पाठिंबा दिला. पण त्यांचाही पराभव झाला. याचा अर्थ जो – जो उबाठा सेनेसोबत गेला, त्यांचा पराभव झाला हे स्पष्ट चित्र आहे. सकाळी सूर्य निघाला, मला नाही दिसला आशिष शेलार यांनी यावेळी भाजपकडून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोपही उपरोधिकपणे फेटाळून लावला. ते म्हणाले, सकाळी सूर्य निघाला मला नाही दिसला. संध्याकाळी चंद्र निघाला मला नाही दिसला. रात्री तारे लुकलुकले, पण मी नाही पाहिले. त्यामुळे त्याला काहीच उत्तर देता येत नाही. ही डोळ्यांवरील पट्टी आहे असे म्हणता येईल. महाराष्ट्रात 2 पोटनिवडणुकांचे निकाल समोर येत आहे. त्याचे महायुती व भाजपचे यश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे राजकारण केले. जनतेचा आशीर्वाद फडणवीस, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांना आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






