
हिंगोली ते सेनगाव रोडवर सवड शिवारात एका तोतया पोलिसाने शेतकऱ्याची फसवणूक करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी पळविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध बुधवारी ता १० गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हिंगोली तालुक्यातील हनवतखेडा येथील रहिवासी असलेले शेतकरी गोविंद लक्ष्मण मूटकुळे मंगळवारी ९ कामा निमित्त हिंगोली येथे आले होते. दुपारच्या सुमारास काम आटोपून ते परत गावी जाण्यासाठी निघाले होते. हिंगोली ते सेनगाव मार्गावर पल्लवी ढाबा ते सवड गावाच्या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीने त्यांची दुचाकी थांबवली. आपण पोलिस असल्याचे भासवून त्या व्यक्तीने मूटकुळे यांचा विश्वास संपादन केला. या परिसरात पोलिसांनी एक किलो गांजा पकडला असून त्यामुळे वाहनांची तपासणी करत असल्याचे त्यांने सांगितले. त्यानंतर अन्य एका दुचाकी वाहन चालकाला भामट्याने थांबवले. त्यानंतर दोघांनाही हातात सोन्याच्या अंगठ्या ठेवू नका खिशात जास्त पैसे ठेवू नका असे सांगत अंगठ्या व मौल्यवान सामान रुमाला बांधून ठेवा असा सल्ला दिला. दोघांजवळील पैसे तसेच मुटकुळे यांच्या हातातील आठ ग्राम वजनाची सोन्याची अंगठी रुमालात बांधली. त्यानंतर दोघांनाही रुमाल परत दिले. मात्र यावेळी भामट्याने हातचालाखी करून मुटकुळे यांच्या जवळील अंगठी स्वतःजवळ घेतली. या अंगठीची किंमत सुमारे ५६,००० रुपये आहे. दरम्यान मुटकुळे यांनी त्यांचा रुमाल खिशात ठेवला अन पुढे प्रवासाला निघाले. घटनास्थळावरून काही अंतरावर गेल्या नंतर मुटकुळे यांनी रस्त्यात थांबून रुमाल काढून पाहणी केली. यावेळी रुमाला मध्ये पैसे, चाब्या सर्व वस्तू होत्या मात्र अंगठी गायब झालेली दिसून आली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. या घटनेनंतर मूटकुळे यांनी बुधवारी १० दुपारी रोजी नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जमादार खांडेकर पुढील तपास करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
