
एकीकडे मुंबईत ‘ऑपरेशन टायगर’च्या भीतीपोटी उद्धव ठाकरेंनी उद्या, १४ जून रोजी ‘मातोश्री’वर सर्व खासदारांची आणीबाणीची बैठक बोलावली असताना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आणि नाराजीचा राज्यभर मोठा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. गडचिरोलीत जिल्हाप्रमुख पदावरून गच्छंती होताच माजी जिल्हाप्रमुखांनी थेट पक्ष कार्यालयाचीच तोडफोड करून सर्व साहित्य पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुसरीकडे, लातूरमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातला. गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अंतर्गत संघर्ष आता अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचला आहे. पक्षाने नुकत्याच गडचिरोली, आरमोरी विधानसभेसाठी पवन गेडाम आणि अहेरी विधानसभेसाठी दिलीप सुरपाम यांची नवे जिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती जाहीर केली. मात्र, नव्या नियुक्त्या होताच माजी जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या रागाचा अनावर झाला. आपल्याला पदावरून डावलल्याचा सूड उगवण्यासाठी शेडमाके यांनी थेट शिवसेना पक्ष कार्यालयावरच हल्लाबोल केला. वासुदेव शेडमाके यांनी पक्ष कार्यालयातील छताचे पीओपीची तोडफोड केली. तसेच टेबल, खुर्च्या, पंखे, वातानुकूलित यंत्रणा (AC) आणि अगदी भिंतीवरचे बल्बसुद्धा माजी जिल्हाप्रमुखांनी हुसकावून स्वतःसोबत नेले. या अजब आणि धक्कादायक तोडफोडीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कमालीची शांतता पसरली असून, निष्ठावंतांच्या पक्षात चाललेल्या या प्रकारावरून आता जोरदार टीका होत आहे. लातूरमध्ये दानवेंसमोरच कार्यकर्त्यांची खदखद दुसरीकडे, मराठवाडा दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते आणि विधार परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा आढावा बैठकीतही आज मोठा गोंधळ उडाला. या बैठकीत पदाधिकारी आपल्याच पक्षाच्या कारभारावर प्रचंड नाराज असल्याचे दिसून आले. बैठक सुरू असताना व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने भाषण करताना, “उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना” यांच्या कार्यपद्धतीची थेट तुलना करण्यास सुरुवात केली. आपल्याच पक्षाच्या नेत्यांसमोर शिंदेंच्या शिवसेनेचे कौतुक किंवा तुलना ऐकून सभागृहातील कट्टर कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी मंचाच्या दिशेने धाव घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली, ज्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर अंबादास दानवे यांनी स्वतः तातडीने हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना आणि संबंधित पदाधिकाऱ्याला शांत केले, त्यानंतर पुढील बैठक पार पडली. ‘मातोश्री’च्या चिंतेत भर; पक्ष नेतृत्व काय करणार? उद्या मुंबईत होणाऱ्या खासदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाला लागलेली गळती कशी रोखायची, यावर रणनीती आखणार आहेत. मात्र, खासदारांसोबतच आता ग्रामीण भागातील स्थानिक जिल्हा पातळीवरील संघटनात्मक ढाचाही पूर्णपणे कोलमडत असल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होत आहे. गडचिरोलीतील कार्यालय तोडफोडीच्या प्रकरणावर आता मातोश्रीवरून शेडमाके यांच्यावर काय कायदेशीर किंवा शिस्तभंगाची कारवाई करतील का? हे पाहावे लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
