
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिल्लीतील तरुण आंदोलनाबाबत एक गंभीर आरोप केला आहे. अभिजीत दीपकेने तरुण पिढीच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू केलेल्या आंदोलनाला सुरुवातीला दोन कोटी फॉलोअर्स मिळाले होते. मात्र, त्याची जात ‘शूद्र’ असल्याचे समजताच लाखो तरुण या आंदोलनापासून दूर झाले, असे आंबेडकर म्हणाले. आजची तरुण पिढी देशातील महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा जातीपातीला अधिक महत्त्व देत आहे. तरुणांची हीच मानसिकता भाजपच्या फायद्याची ठरत असल्याचा दावा आंबेडकरांनी केला. यामुळे मोठे आंदोलन उभे राहूनही ते फिसकटण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि विशेषतः काँग्रेसवर टीका केली. विधान परिषद निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेवटपर्यंत लढले, मात्र काँग्रेसचे उमेदवार लढताना दिसले नाहीत आणि ते सरळ पराभूत झाले, असे त्यांनी नमूद केले. आज प्रत्येक राजकीय माणूस गुलाम झाला आहे की काय, अशी भीती वाटत आहे, असे आंबेडकर म्हणाले. विरोधी पक्षातील अनेकांना भाजपमध्ये जाण्याची सुप्त इच्छा असून, यात काँग्रेसचे नेतेही मागे नाहीत, असे त्यांचे मत होते. भाजपमध्ये न जाणारेच आता खरे विरोधक उरले आहेत, असेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे आता प्रत्यक्षात विसर्जन झाले असून, प्रत्येक जण भाजपसोबत जाऊन आपापली तडजोड करत आहे, असा दावा आंबेडकरांनी केला. उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री कोणाची भेट घेतली, याचा खुलासा जनतेसमोर करावा, असे थेट आव्हानही त्यांनी दिले. काँग्रेसचे आमदार आणि नगरसेवक फुटूनही पक्ष कोणतीही कारवाई करत नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) कापूस खरेदी सुरू केली असली, तरी नवीन पद्धतीचा अवलंब करून कापसाच्या गाठी पाडलेल्या भावात विकल्या जात आहेत. ही संपूर्ण शासकीय व्यवस्था कोलमडून पडावी आणि याचा थेट फायदा व्यापारी वर्गाला व्हावा, असा डाव रचला जात आहे, असे त्यांनी आरोप केला. याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून शासनाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात धान, सोयाबीन आणि ज्वारीची खरेदी केंद्रे व दर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. आरएसएस स्वतःला चारित्र्यवान म्हणवते, मात्र सरसंघचालक मोहन भागवत हे पंतप्रधान मोदींचे गुलाम झाल्यासारखे चित्र आहे, अशी टीका आंबेडकरांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
