
पैठण नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गुरुवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल होण्याची शक्यता असून, यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होईल, अशी माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता मंगेश शेलार यांनी दिली आहे. नाशिक परिसरातील संततधार पावसामुळे गोदावरी नदी पूर्ण क्षमतेने म्हणजेच दुथडी भरून वाहत आहे. ऐतिहासिक दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून, नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वरच्या भागातून होणाऱ्या या प्रचंड पाण्याच्या आवकेमुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी आता वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता घेतलेल्या नोंदीनुसार, जायकवाडी धरणाची पाणीपातळी: ४५८.८९५ मीटर (१५०५.५६ फूट), एकूण जलसाठा १३६०.९५५ दलघमी, जिवंतसाठा ६२२.८४९ दलघमी तर टक्केवारी २८.६९ टक्के आहे. गेल्या २४ तासांत जायकवाडीच्या मुख्य धरण क्षेत्रात केवळ १० मिमी पावसाची नोंद झाली असून, १ जूनपासून आजवर येथे ६७ मिमी एकूण पाऊस पडला आहे. स्थानिक पातळीवरील पावसामुळे धरणाच्या साठ्यात विशेष वाढ झाली नसली, तरी २४ तासांत सरासरी २,८७५ क्युसेक वेगाने पाणी येत होते. आता नांदूर मधमेश्वरहून येणाऱ्या १८ हजार क्युसेक पाण्याच्या प्रवाहाची भर पडणार असल्याने गुरुवारी सकाळपासून धरणाची पातळी झपाट्याने वाढणार आहे. धरण क्षेत्रात संथ पाऊस, पण आवक दमदार
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
