
एका पाच वर्षीय मुलीच्या डोळ्यात खेळताना पेन्सिल घुसली. या घटनेत चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. या पाच वर्षीय चिमुकलीची दृष्टी वाचवण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील डॉक्टरांना यश आले आहे. नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया करून चिमुकलीला नवजीवन दिले. सुरुवातीला या चिमुकलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, शस्त्रक्रियेची गुंतागुंत आणि उपचारांचा संभाव्य खर्च लक्षात घेता, तिला पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. घाटीतील नेत्रशल्य चिकित्सा शास्त्र विभागाने रुग्णाची सखोल तपासणी करून तातडीने शस्त्रक्रियेचे नियोजन केले. अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख डॉ. अर्चना वरे यांच्या नेतृत्वात डॉ. महेश सोनपेठकर, डॉ. वेणुगोपाल रांगू आणि डॉ. तपन जक्कल यांनी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी विभागातील वरिष्ठ निवासी डॉ. मोहन मोरखडे, डॉ. इमाद ख्वाजा तसेच कनिष्ठ निवासी डॉ. मधुश्री तोरसकर, डॉ. सोनिया हाके आणि डॉ. साक्षी तिवारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेदरम्यान, बधिरीकरणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. गायत्री तडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. प्रेरणा शिंदे आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच, शस्त्रक्रिया कक्षातील परिचारिका कालिंदी इधटे, यमुना मुंढे, गीता गीते, सोनाली गायकवाड, विकास गायकवाड, अर्चना सांगळे आणि इतर कर्मचाऱ्यांनीही या यशस्वी शस्त्रक्रियेसाठी मोलाचे सहकार्य केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
https://doonitednews.in/advertisement-rate-card/