आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सर्व सेवा ठप्प: अमरावतीत कार्यालयासमोर निदर्शने; राज्यभरातील 945 कर्मचारी सहभागी – Amravati News

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, सर्व सेवा ठप्प:  अमरावतीत कार्यालयासमोर निदर्शने; राज्यभरातील 945 कर्मचारी सहभागी – Amravati News



मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे अमरावती येथील प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील सर्व सेवा मंगळवारपासून ठप्प झाल्या आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी नागरिकांना कोणतीही कागदपत्रे किंवा सेवा मिळाली नाही. शासनाने या आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून लवकर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांसह सामान्य नागरिकांकडूनही होत आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आरटीओ कार्यालयासमोर शासनाविरुद्ध निदर्शनेही केली. सेवा प्रवेश नियमांसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने २ जूनपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले होते. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवार, १६ जूनपासून बेमुदत संपाचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी आज नियमित कामकाजापासून दूर राहिल्याने विविध कामांसाठी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. संघटनेने २ जून रोजी राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये दोन तासांचे धरणे आणि निदर्शने केली होती. त्यानंतर ९ जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. मात्र, या आंदोलनानंतरही शासनाने मागण्यांबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न केल्यामुळे पूर्वनियोजित आंदोलनाच्या पुढील टप्प्यानुसार राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी १६ जूनपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिल मानकर, राज्य संघटक संदीप खवले यांच्यासह अभिजीत गावंडे, अक्षय राठोड, अमोल माठोडे, उज्वल ठाकरे, संजय चौधरी, देवानंद खंडारे आणि अन्य पदाधिकारी-कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या अनेक वर्षांपासून शासन स्तरावर रखडल्या असून त्या तातडीने मार्गी लावाव्यात, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे संघटनेने म्हटले आहे. या आंदोलनात स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ३२ पुरुष आणि ९ महिला असे एकूण ४१ कर्मचारी सहभागी झाले आहेत. अमरावतीसह अकोला, बुलडाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील ८८ पुरुष आणि २५ महिला असे एकूण ११३ कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत. प्रदेश उपाध्यक्ष अनिल मानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील एकूण ९४५ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ सेवा ठप्प झाल्या आहेत. या संपामुळे ड्रायव्हिंगचे शिकाऊ व पक्के लायसन्स, लायसन्सचे नूतनीकरण, लायसन्समधील माहितीत बदल, डुप्लिकेट लायसन्स, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट (आयडीपी), नवीन वाहनांची नोंदणी, नोंदणी प्रमाणपत्रांचे नूतनीकरण, मालकी हक्क बदल, पत्ता बदल, बँक बोजा चढवणे/उतरवणे, वाहन दुसऱ्या राज्यात नेण्यासाठीची एनओसी, वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, वाहतूक परमिट आणि कर संकलन यासह अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. तथापि, यातील बहुतेक सेवा सारथी पोर्टलद्वारे ऑनलाइनही उपलब्ध आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp