
देशभरातील आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी शुक्रवारी ‘काळा दिवस’ पाळत शासनाच्या धोरणांविरोधात निदर्शने केली. अमरावती जिल्ह्यातही ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रांबाहेर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान, महापालिकेच्या उपायुक्त भाग्यश्री बोरकर यांच्यामार्फत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांना निवेदन पाठवण्यात आले. अमरावती शहरात सेंटर फॉर इंडियन ट्रेड युनियन्सच्या (सीटू) नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. अमरावती जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला. काही ठिकाणी मनपा हद्दीतील आरोग्य केंद्रांमधील आशा वर्कर्सनी काळे ड्रेस आणि साड्या परिधान करून आपला निषेध नोंदवला. आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार, मार्च २०२५ मध्ये संसदेत जाहीर करण्यात आलेल्या आशा सेविकांच्या प्रोत्साहनपर मानधनवाढीची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे वाढीव प्रोत्साहन रक्कम तत्काळ अदा करावी, गेल्या एका वर्षाची थकबाकी द्यावी आणि यासंदर्भातील शासन आदेश तातडीने काढावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. आशा सेविका अत्यल्प मानधनावर आरोग्य विभागातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. त्यांना अनेक अतिरिक्त कामांचा ताण, अहवाल सादर करण्याची सक्ती, अपमानास्पद वागणूक आणि प्रोत्साहन रकमेतील कपात अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर, आशा सेविकांना शासकीय कामगाराचा दर्जा द्यावा, किमान २६ हजार रुपये मासिक वेतन द्यावे, तसेच ईएसआयसी, ईपीएफ, ग्रॅच्युइटी, पेन्शन, सामाजिक सुरक्षा, नियमितीकरण, सहा महिन्यांची सवेतन प्रसूती रजा, पदोन्नती धोरण, प्रवास भत्ता, स्कूटर सुविधा, डिजिटल कामासाठी टॅबलेट व डेटा सुविधा यांसारख्या विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या. या मागण्या मान्य न झाल्यास ६ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या मोर्चात आशा सेविका, गटप्रवर्तक, अंगणवाडीच्या सेविका-मदतनीस आणि मध्यान्ह भोजन कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनात सीटूचे जिल्हाध्यक्ष कॉ. सुभाष पांडे, कोषाध्यक्ष कॉ. राजेंद्र भांबोरे, जिल्हा सचिव कॉ. वंदना बुरांडे, ज्योती नालट, किरण रंगारी, ममता काळे, उषा कुऱ्हाडे, संगीता अवताळे, अश्विनी लोखंडे, कविता बेलसरे, श्वेता सावरकर, गायत्री बेलसरे, दुर्गा वासनिक आदींसह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
