
ओमान केवळ गुंतवणुकीच्या शोधात नसून, शिक्षण, संस्कृती आणि नवोपक्रम या क्षेत्रांत समान मूल्ये निर्माण करू शकतील अशा अर्थपूर्ण भागीदारीसाठी उत्सुक आहे, असे प्रतिपादन ओमानच्या वाणिज्य, उद्योग आणि गुंतवणूक प्रोत्साहन मंत्रालयाचे परकीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य सल्लागार पंकज खिमजी यांनी केले. ओमानच्या एका उच्चस्तरीय शिष्टमंडळाने सिंबायोसिसला दिलेल्या भेटीदरम्यान ते बोलत होते. या शिष्टमंडळाच्या स्वागतासाठी सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. शा. ब. मुजुमदार, सिंबायोसिस प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आणि वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे प्रोव्होस्ट डॉ. राजीव येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. खिमजी यांनी नमूद केले की, भारत आणि ओमानचे नाते ५ हजार वर्षांहून अधिक जुने असून ते व्यापार, संस्कृती आणि सामायिक नागरी मूल्यांवर आधारलेले आहे. आज आम्ही विशिष्ट सहकार्याद्वारे हे संबंध एका नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्यांनी ओमानच्या ‘व्हिजन २०४०’ आराखड्यावर प्रकाश टाकत उत्पादन, लॉजिस्टिक्स, पर्यटन आणि शिक्षण क्षेत्रातील संधी अधोरेखित केल्या. सिंबायोसिससारख्या संस्थांनी या भागीदारीचा भाग व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. शिष्टमंडळाचे स्वागत करताना डॉ. शा. ब. मुजुमदार म्हणाले की, जगाला खऱ्या अर्थाने एकत्र आणण्याची ताकद फक्त शिक्षणातच आहे. पंकज खिमजी यांना सिंबायोसिसने ‘डी.लिट’ पदवी देऊन सन्मानित केले होते, याची आठवण करून देत ते आता सिंबायोसिस कुटुंबाचेच एक सदस्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. डॉ. मुजुमदार यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाने केवळ कुशल व्यावसायिकच तयार करू नयेत, तर आपली सांस्कृतिक मुळे जपत जागतिक दृष्टिकोन स्वीकारणारे नीतिमान मानवी मूल्ये असलेले नागरिक घडवले पाहिजेत. ८५ पेक्षा जास्त देशांतील विद्यार्थी सिंबायोसिसमध्ये शिक्षण घेत असून, यामुळे भारत आणि ओमानमधील सांस्कृतिक बंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भेटीमुळे दोन्ही देशांतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहकार्य वाढून जागतिक सलोख्याला मदत होईल, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






