
ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात सूत्रसंचालन करताना केलेल्या विधानावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते किरण पावसकर यांनी अखेर आपली भूमिका मांडली. “शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करण्याचे धाडस मी स्वप्नातही करणार नाही, माझ्या विधानाचा तसा अर्थ काढणे पूर्णपणे चुकीचे आहे,” असे स्पष्टीकरण पावसकर यांनी दिले आहे. ठाकरे गटाने पावसकरांच्या माफीची आक्रमक मागणी केल्यानंतर, त्यांनी माध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आणि ठाकरे गटावरच पलटवार केला. आपल्यावरील आरोपांचे स्पष्ट शब्दांत खंडन करताना किरण पावसकर यांनी बाळासाहेबांबद्दलचा आदर व्यक्त केला. “आमच्या शिवसेना पक्षात बाळासाहेबांचा अपमान करण्याचे धाडस कोणीही करणार नाही. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात असा माणूस सापडणार नाही. बाळासाहेबांनी आम्हाला पदे दिली, त्यांच्या विचारामुळेच आम्ही घडलो आणि मोठे झालो. मग ज्यांच्यामुळे आम्ही इथवर पोहोचलो, त्यांचा अवमान आम्ही कसा करू?” अशी विचारणा किरण पावसकर यांनी केली. बाळासाहेबांबद्दल चुकीचे कसे बोलू शकेन? “मी याआधी उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्या बंडाच्या काळातही मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कधीही एकही अपशब्द काढला नव्हता. तर आता मी त्यांच्याबद्दल चुकीचे कसे काय बोलू शकेन?” असे पावसकर यांनी स्पष्ट केले. अपमान केला असता तर शिंदे साहेबांनी पक्षात ठेवले असते का? किरण पावसकर यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील शिस्तीचा दाखला दिला. “शिवसेना पक्षात शिस्त ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि या शिस्तीचे शिवसेनेत अत्यंत काटेकोरपणे पालन केले जाते. जर मी खरोखरच बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला असता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पक्षात ठेवले असते का?” असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना विचारला. काँग्रेस आणि ‘भारत जोडो’वरून ठाकरे गटावर जोरदार निशाणा स्वतःवरील आरोपांना उत्तर देताना किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला ‘काँग्रेस धार्जिण्या’ म्हणत कडाडून टीका केली. ‘जर शिवसेनेची काँग्रेस झाली, तर मी हे दुकान बंद करून टाकेन,’ असे खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले होते. ठाकरे गटाने हा विचारही कधीतरी जनतेला दाखवावा, असे आव्हान किरण पावसकर यांनी ठाकरे गटाला दिले. राहुल गांधी जेव्हा ‘भारत जोडो यात्रा’ घेऊन फिरत होते, तेव्हा ठाकरे गटाचे नेते त्यांना जाऊन प्रेमाने मिठी मारत होते. त्यावेळी या नेत्यांनी बाळासाहेबांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा साधा विचारही केला नाही, अशी टीका पावसकर यांनी केली. हे ही वाचा… किरण पावसकरांच्या विधानाने राजकारण तापले:बाळासाहेबांच्या आवाहनाची खिल्ली उडवल्याचा ठाकरे गटाचा आरोप, शिंदे सेनेकडून सारवासारव ठाकरेंचे ६ फुटीर खासदारांच्या शिंदे सेनेतील प्रवेशावेळी सोहळ्याचे सूत्रसंचालन करणारे शिंदे सेनेचे नेते किरण पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका ऐतिहासिक आवाहनाचा संदर्भ दिल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. पावसकर यांनी बाळासाहेबांच्या शब्दांची जाहीर खिल्ली उडवल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक झाला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांना पावसकरांच्या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
