
हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डीएपी खत मिळत नसल्याच्या तक्रारी असून कृषी खात्याने जिल्ह्यात डीएपीच्या 500 मेट्रीक टन पैकी 300 मेट्रीक टन बफर स्टॉक पाच तालु्क्यांसाठी रिलीज करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांची सोमवारी ता. 22 भेट घेऊन चर्चाही केली आहे. या संदर्भात क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रविण मते, अमोल एकशिंगे, पवन मोरे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत मुद्दे मांडले. हिंगोली जिल्ह्यात खताचा तुटवडा निर्माण होत आहे. बाजारपेठेत डीएपी खत नसल्याचे विक्रेत्यंकडून सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. तर आता मोठ्या पावसानंतर पेरणीला सुरवात होणार असून त्यामुळे बाजारपेठेत कृषी निविष्ठा खरेदीसाठी गर्दी होईल. त्याचा गैरफायदा घेऊन बोगस खते विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कृषी खात्याने अधिक सकर्त राहणे गरजेचे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या शिवाय डीएपीचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हयाच्या बफर स्टॉकमध्ये असलेल्या 500 मेट्रीकटन पैकी 300 मेट्रीक टन खत पाचही तालु्क्यांना समान पध्दतीने वाटप करावे तसेच खत वाटप करतांना विक्रेत्यांचे चेहरे पाहून वाटप करण्याएेवजी शेतकऱ्यांची सोय होईल याचे नियोजन करूनच खत वाटप करावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच खत उपलब्ध झाले होते. सदर खत रॅकपॉईंटवर आल्यानंतर पावसामुळे खत भिजल्या केली. सदर भिजलेले खत शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे प्रकार होत आहे. त्यामुळे भिजलेले खत वितरीत करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय सन 2024-25 मधील पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांची प्रलंबित पीक विमा रक्कम अदा करण्यात यावी, अशी ठाम भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. जिल्ह्यात बोगस जैविक औषधे, खते व बियाण्यांचा वाढता सुळसुळाट रोखण्यासाठी व्यापक तपासणी मोहीम राबवून दोषी आढळणाऱ्या उत्पादक, विक्रेते व संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. या मागणीकडे कृषी विभागाने गांभीर्याने घ्यावे अन्यथा क्रांतीकारी शेतकरी संघटना तिव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
