
केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तर मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना राज्याचा सेवाकर्मी पुरस्कार मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या यशाबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी ता. १ अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे. केंद्र सरकारच्या सुचने नुसार मिशन कर्मयोगी उपक्रमातील साधना सप्ताहात ता. २ ते ता. ८ एप्रील या कालावधीत जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून एआय च्या प्रशिक्षणासोबतच इतर चार तासाचे प्रशिक्षण पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. जिल्हा परिषद अंतर्गत विभागांमधून सुमारे ५०९८ कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी ५०२२ कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण केले. तर ४७२२ कर्मचाऱ्यांनी चारतासाचा कोर्स पूर्ण केला आहे. त्यामुळे राज्यात इतर जिल्हयांच्या तुलनेत हिंगोली जिल्हा परिषदेच्या ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी कोर्सस पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या शिवाय राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा उत्कृष्ठ कार्याबद्दल सेवाकर्मी पुरस्कार देऊन गौरव केला आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या या कामगिरी बद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्यासह अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, केशव गड्डापोड, विजय बोराटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रियंका राजपूत, यांचा सत्कार करून कौतूकाची थाप दिली आहे. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






