
राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली येथे ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणत्याही अटी व शर्तींशिवाय करण्यात यावी तसेच संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना खत व बियाणे वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे. खते व बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण ठेवून दरकपात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच शेतीसाठी लागणाऱ्या सर्व कृषी निविष्ठांच्या किमती कमी कराव्यात या मागण्या मांडल्या जाणार आहेत. यासोबतच नीट परीक्षेतील पेपरफुटी व इतर गैरप्रकारांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पारदर्शक परीक्षा प्रणाली राबवावी, अशीही भूमिका मांडण्यात येणार आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवून जीवनावश्यक वस्तू स्वस्त कराव्यात, तसेच शेतकरी, युवक, विद्यार्थी व नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जाणार आहे जलजीवन योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा, गॅस दरात कपात करावी, नाफेड अंतर्गत माल खरेदी करूनही पैसे न देणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी, हिंगोली जिल्ह्यातील खड्डेमुक्त रस्ते करावेत तसेच शक्तीपीठ मार्ग रद्द करावा, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात नागरिक व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत संदेश देशमुख यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
