
भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आणि मेळघाटचे माजी आमदार पटल्या गुरुजी मावस्कर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कौटुंबिक सूत्रांनुसार, अमरावती येथील चौधरी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच सोमवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी धारणी येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पटल्या गुरुजी मावस्कर हे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेडचे (BHEL) माजी संचालक आणि अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अन्न पुरवठा विभागाचे निवृत्त उपायुक्त रमेश मावस्कर यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई आणि मोठा आप्त परिवार आहे. एक सहृदयी व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
