
नागपूर येथील संविधान चौकात ‘कॉकरोच जनता पार्टी’ने विद्यार्थ्यांच्या विविध गंभीर प्रश्नांवर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत पक्षाचे मुख्य संयोजक अभिजित दीपके यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशात ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर सातत्याने लीक होत असल्याने गरीब आणि कष्टकरी कुटुंबांतील हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले. दीपके यांनी आपल्या भाषणात गंभीर आरोप केला की, या बिघडलेल्या शैक्षणिक व्यवस्थेमुळे विद्यार्थी नैराश्यातून आत्महत्या करत नसून, या सरकारने केलेल्या त्या एकप्रकारच्या ‘हत्या’ आहेत. या आंदोलनाला सुप्रसिद्ध सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांनीही उपस्थित राहून पाठिंबा दिला. परीक्षा घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या नागपूरची विद्यार्थिनी आकांक्षा आणि राजस्थानचा विद्यार्थी प्रदीप मेघवाल यांच्या कुटुंबांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे दीपके यांनी सांगितले. आमदार खरेदी करण्यासाठी सरकारकडे ५० खोके असतात, मग या मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना १-१ कोटी रुपयांची मदत का दिली जात नाही, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केला. देशातील या ढासळलेल्या शिक्षण व्यवस्थेला जबाबदार धरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी त्यांनी संविधान चौकातून केली. सर्वोच्च न्यायालयाच्या एका टिप्पणीचा संदर्भ देत दीपके पुढे म्हणाले की, ही भ्रष्ट यंत्रणा देशातील तरुणांना ‘किडे-मकोडे’ किंवा ‘कॉकरोच’ समजत असेल, तर आम्ही ही ओळख स्वीकारली आहे. कॉकरोच तिथेच असतो जिथे घाण असते, त्यामुळे या सिस्टीममधील भ्रष्टाचाराची घाण साफ करण्याचे काम आता तरुण करतील. परीक्षांमधील गैरप्रकार आणि बेरोजगारीच्या विरोधात २० तारखेला देशातील सर्व राज्यांतील विद्यार्थी दिल्लीत एकत्र येणार असून, नागपूरकरांनी या ‘चलो दिल्ली’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
