
हिंगोली जिल्ह्यातील ११२ शिक्षकांना अवघ्या दोन तासात समुपदेशनाने उच्चश्रेणी मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून मंगळवारी ता. ३० हि प्रक्रिया पार पडली आहे. सर्वच मुख्याध्यापकांना पदोन्नती नंतर हवे ते ठिकाण मिळाल्यानंतर आता शाळेच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे ८८० प्राथमिक शाळा आहेत. या शाळांपैकी अनेक ठिकाणी उच्चश्रेणी मुख्याध्यापकाची पदे रिक्त होती. त्यामुळे शाळेतील जेष्ठ शिक्षकांनाच या पदाचा पदभार पहावा लागत होता. त्यामुळे एकाच वेळी दोन पदाचे काम करावे लागत असल्याने त्याचा गुणवत्तेवर परिणाम होत होता. दरम्यान, जिल्हयात सन २०२४ मध्ये पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर दोन वर्षापासून पदोन्नती झालीच नाही. सदर बाब लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तातडीने पात्र शिक्षकांची यादी तयार करून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी समृध्दी दिवाने, प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे, शिक्षण विभागाचे कर्मचारी विजय बांगर यांच्या उपस्थितीत ११२ शिक्षकांची समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील सर्वच रिक्त जागांची माहिती देऊन पात्र शिक्षकांना त्यांनी मागितलेल्या ठिकाणी पदस्थापना दिली आहे. अवघ्या दोन तासात हि प्रक्रिया पार पडली आहे. दरम्यान, शिक्षकांना पदोन्नतीमध्ये हव्या त्या ठिकाणी पदस्थापना मिळाल्यामुळे त्याचा शाळेच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. तर दोन वर्षापासून रखडलेल्या पदोन्नती मार्गी लावल्याबद्दल शिक्षक संघटनांनी मुख्यकार्यकारी अधिकारी गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
