
अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक सत्राचा दीक्षारंभ कार्यक्रम सुरू झाला आहे. या कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयाविषयी आवश्यक माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना हितोपदेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी हा दीक्षारंभ कार्यक्रम आयोजित केला जातो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकास विषयांवर मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात दररोज प्रा. विश्वास जाधव यांच्या योग सत्राने होते. उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र मेटे यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातील संधी, शिस्त, मूल्ये आणि जबाबदाऱ्या यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी महाविद्यालयाची व ग्रंथालयाची सविस्तर माहिती दिली. डॉ. प्रशांत हरमकर यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. कुलदीपसिंग मोहाडीकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी (एनईपी) माहिती दिली. डॉ. कविता वाटाणे यांनी क्रीडा व शारीरिक विकासाचे महत्त्व पटवून दिले. संगीत विभागप्रमुख डॉ. गजानन केतकर आणि प्रा. मीना सहारे यांनी स्फूर्ती गीत गायन केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. मनोज जोशी यांनी केले, तर डॉ. गजानन भारती यांनी आभार मानले. दीक्षारंभाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. वैशाली टाकोडे यांनी आचारसंहिता, लिंगसंवेदनशीलता, लैंगिक छळ प्रतिबंध तसेच विद्यार्थ्यांचे हक्क व जबाबदाऱ्यांविषयी मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. किशोर साबळे, डॉ. संजय कटाईत आणि डॉ. कुमार बोबडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती दिली. किशोर राजगडे, अमोल देशमुख आणि धनंजय देशमुख यांनी प्रवेश प्रक्रिया, परीक्षा प्रणाली व कार्यालयीन कामकाजाविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. गुरुवारी विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. संगीता भुयार यांनी संविधानिक मूल्ये व राष्ट्रीय एकात्मता या विषयावर मांडणी केली. डॉ. कुलदीपसिंग मोहाडीकर यांनी अँटी-रॅगिंग, तर डॉ. कुमार बोबडे यांनी कौशल्य विकास व प्लेसमेंट यावर मार्गदर्शन केले. डॉ. अपर्णा सरोदे आणि डॉ. राजेश मिरगे यांनी स्पर्धा परीक्षा व करिअर समुपदेशन या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. हा दीक्षारंभ कार्यक्रम आगामी ११ जुलैपर्यंत चालणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
