
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा तीव्र निषेध केला आहे. नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा लाठीमार झाल्याचा आरोप आहे. केंद्र सरकार संविधानविरोधी भूमिका घेत असून लोकशाही मूल्यांना पायदळी तुडवत असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यांपासून नीट पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी विविध राज्यांतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा तिवारी यांनी केला. दिल्लीतील जंतर-मंतर येथे काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीला आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. याच मुद्द्यांवर पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि क्रांतिकारी जनता पार्टीचे अभिजीत दिपके यांनी उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाला काँग्रेस, समाजवादी पक्षासह अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याने केंद्र सरकार अस्वस्थ झाल्याचा आरोप तिवारी यांनी केला. खासगी रुग्णालयाचे कर्मचारी आणि साध्या वेशातील पोलिसांनी वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून बळजबरीने नेल्याचा दावाही त्यांनी केला. लोकशाही आणि अहिंसक मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे निंदनीय आहे, असे तिवारी म्हणाले. आंदोलक विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमारातून सत्ताधाऱ्यांचा उन्मत्तपणा दिसून येतो. शिक्षणमंत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नातून सरकारचा भ्रष्टाचारी चेहरा उघड झाल्याची टीकाही त्यांनी केली. मोदी सरकारच्या मनमानी कारभाराचा एनडीएतील घटक पक्षांनी वेळीच गंभीरपणे विचार करावा. अन्यथा, देशावरील आर्थिक आणि सामाजिक संकटांची जबाबदारी महायुती आणि एनडीएच्या मित्रपक्षांनाही स्वीकारावी लागेल, असा इशारा तिवारी यांनी दिला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.