वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही: नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण, वांगचुक प्रकरणावरही भाष्य – Solapur News

वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही:  नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण, वांगचुक प्रकरणावरही भाष्य – Solapur News



“राजकारणात प्रत्येकाचा एक विशिष्ट काळ असतो. माझे राजकीय गुरू विलासराव देशमुख नेहमी एक गोष्ट सांगायचे की, वेळेच्या आधी आणि नशिबापेक्षा जास्त कोणालाही काहीच मिळत नाही,” अशा सूचक शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले यांनी केंद्र आणि राज्यातील महायुती सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करत चौफेर टीका केली. लडाखचे आंदोलक सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शांततापूर्ण मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्यांवर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून थेट तुरुंगात डांबण्याचा नवा कायदा केंद्र सरकारने आणला आहे. दिल्ली पोलिसांनी ज्या हुकूमशाही पद्धतीने आंदोलकांना वागवले, ती थेट लोकशाहीची हत्या आहे, असे नाना पटोले म्हणाले. मोदी सरकारने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची शांतता आणि सत्याग्रहाची तत्त्वे देशातून पूर्णपणे मोडीत काढली असून, जनतेमध्ये आता या दडपशाहीविरोधात तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला असल्याचे नाना पटोले म्हणाले. नीट घोटाळ्यावरून हल्लाबोल ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित भ्रष्टाचारावर बोलताना त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागितला. “नीट परीक्षेत ज्यांनी कोट्यवधींचा घोटाळा केला, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आता तर थेट गुणपत्रकांमध्येच (मार्कशीट) फेरफार झाल्याचे मोठे घोटाळे समोर येत आहेत. अशा संस्थांवर आता थेट लष्कर (मिल्ट्री) तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे,” असे पटोले म्हणाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात निघणाऱ्या काँग्रेसच्या आगामी मोर्चात आपण स्वतः सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तसेच, महाराष्ट्रातील राजकीय पक्षफुटीवर भाष्य करताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा फूट पाडण्यात आली, तेव्हाच जर घटनेच्या ‘तिसऱ्या अनुसूची’ (Schedule 3) नुसार बंडखोरांवर कठोर कारवाई झाली असती, तर आज कोणाचेही असे वागण्याचे धाडस झाले नसते. केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी पाशवी बहुमताच्या जोरावर नियमांना बगल देऊन अपात्र खासदारांनाही सरळ मान्यता दिली,” असा थेट आरोप त्यांनी केला. एक रुपया लुटून चार आणे देणारे बेईमानांचे सरकार! राज्यातील महायुती सरकारला ‘शेतकरी विरोधी’ संबोधत नाना पटोले यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणांची जोरदार खिल्ली उडवली. “मुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आणि सभेत टाळ्या वाजवून घेतल्या. परंतु, हे सरकार अत्यंत बनवाबनवी करणारे आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून आधी एक रुपया लुटायचा आणि नंतर जाहीरपणे त्यांना चार आणे देऊन उपकाराची भाषा करायची, असा हा प्रकार आहे. भाजप केवळ बळिराजाची चेष्टा करत असून, त्यांना शेतकऱ्यांच्या सुख-दुःखाशी काहीही देणेघेणे नाही,” असे ते म्हणाले. अण्णा हजारेंच्या शांततेवर उपरोधिक टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सध्याच्या भूमिकेवर विचारले असता पटोले यांनी त्यांच्या शांततेवर आश्चर्य व्यक्त केले. “अण्णा हजारे आता वयोवृद्ध झाले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलणे योग्य नाही. मात्र, कधीकाळी ज्यांना देशाचे ‘महात्मा गांधी’ म्हणून संपूर्ण देशात संबोधले जायचे, ते अण्णा आज देशात आणि राज्यात सुरू असलेल्या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, ते पूर्णपणे शांत बसले आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »