तलावांना कुंपण घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश: अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी पावले – Amravati News

तलावांना कुंपण घालण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश:  अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाची मोठी पावले – Amravati News



अमरावती जिल्ह्यात तलावांना सुरक्षा कुंपण नसल्यामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील सर्व १४ तहसीलदारांना तातडीने तलावांना कुंपण घालण्याचे आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत. जिल्ह्यात घातखेडा, भिवापुरकर तलाव यांसारखे अनेक लहान-मोठे जलप्रकल्प आहेत. सिंचनासाठी वापरले जाणारे हे तलाव अनेकदा पर्यटन स्थळे बनतात. मात्र, बहुतांश तलावांच्या परिसरात योग्य सुरक्षा कुंपण किंवा धोक्याचे फलक नसल्यामुळे ते ‘डेथ ट्रॅप’ ठरत आहेत. गेल्या काही वर्षांत अमरावती जिल्ह्यात तलावांमध्ये बुडून तरुणांचा मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. विशेषतः पावसाळ्यात आणि सुट्ट्यांच्या दिवशी सुरक्षा रक्षक किंवा कुंपण नसल्याने नागरिक पाण्याच्या अगदी जवळ जातात. खोलीचा अंदाज न आल्यामुळे किंवा पाय घसरून पाण्यात पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वी अनेकदा तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. अमरावती मनपाचे माजी नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी या संदर्भात प्रशासनावर दबाव आणला होता. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासन, महसूल विभाग आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने बचाव मोहीम राबवली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी किंवा गर्दीच्या हंगामापूर्वी सुरक्षेचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे तलावांवरील अपघात थांबतील आणि निष्पाप लोकांचे जीव वाचतील, अशी आशा अमरावतीकर व्यक्त करत आहेत. या मोहिमेअंतर्गत, सर्व १४ तहसीलदारांना आपापल्या क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक तलावांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा अंदाज येत नाही, तिथे ‘पाण्यात उतरण्यास मनाई आहे’ किंवा ‘धोक्याचे क्षेत्र’ असे स्पष्ट फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कामासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) किंवा स्थानिक विकास निधीतून तरतूद करण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »