
लडाखमधील शिक्षणतज्ञ सोनम वांगचूक यांच्या ‘चलो संसद’ आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी अमरावती शहरात सोमवारी तीन ठिकाणी निदर्शने करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेच्या सदस्यांनी इर्विन चौकात आंदोलन केले, तर कलेक्ट्रेटवर विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध नोंदवला. संविधान लोकशाहीवादी जनसंघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) संतोष काकडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. याशिवाय, इतर दोन संघटनांनीही आंदोलनाच्या शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले, ज्यात सोनम वांगचूक यांच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली. इर्विन चौकातील आंदोलनाचे नेतृत्व भारतीय बौद्ध महासभेचे प्रदेश पदाधिकारी विजय चोरपगार यांनी केले. आरडीसींना निवेदन सादर करताना संघटनेचे पदाधिकारी हरिष चरपे, सुनील घटाळे, हरिश केदार, प्रा. प्रवीण गुल्हाने, मुकूंद काळे आदी उपस्थित होते. आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील खासगीकरण, व्यापारीकरण आणि भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय होत असल्याचा आरोप केला. ‘नीट’ परीक्षेतील पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यावेळी ‘नीट’सह इतर सर्व परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना न्याय आणि भरपाई मिळावी, तसेच शिक्षण क्षेत्रातील अनागोंदी आणि भ्रष्टाचाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या. अमरावती जिल्ह्यातील विविध संस्था व संघटनांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या तिन्ही आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच शिक्षण क्षेत्रातील सुधारणांसाठी हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गर्ल्स हायस्कूल चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान वाहतूक कोंडी झाली होती. गाडगेनगरचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांनी काही काळासाठी कलेक्ट्रेटकडून गर्ल्स हायस्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दोन्ही दिशेने वाहतूक वळवली. दुपारी ३ नंतर वाहतूक सुरळीत झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.