
राज्याच्या राजकीय वर्तुळात आगामी काळात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा सुरू असतानाच, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या विस्तारावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागलेले राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनरागमन चर्चेवर जरांगे पाटील कमालीचे भडकले आहेत. “धनंजय मुंडेंना मंत्रिपद कसे देता ते बघतोच. मुंडेंना पुन्हा मंत्री केले, तर मराठा समाज अंगावर येईल,” असा आक्रमक इशारा त्यांनी दिला आहे. पत्रकारांनी धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि तिखट शब्दांत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “धनंजय मुंडे यांच्या नास्तिक आणि उपद्रवी वृत्तीमुळे वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या मराठा आणि वंजारी समाजात नाहक वैर निर्माण झाले आहे. त्यांच्यामुळेच दोन्ही समाजांमधील पारंपरिक प्रेम संपले आहे.” “अजित पवारांनी ज्याला लाथ मारून पक्षातून/मंत्रिपदावरून बाहेर काढले, त्याला जर पुन्हा मंत्री करणार असाल, तर मराठे गप्प बसणार नाहीत. राष्ट्रवादी आणि भाजप त्याला मंत्रिपदावर कसे घेतात, हेच आता आम्ही बघतो,” असे आव्हान जरांगे यांनी दिले. तसेच “अजित पवारांचा पक्ष गुंडांना सांभाळतो काय?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. पंकजा मुंडेंच्या कारभारावर तोफ धनंजय मुंडे यांच्यासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर आरोप केले आहेत. जालन्यातील स्थानिक आमदारांनीच आपल्याकडे याविषयी तक्रार केल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, “जालन्यातील भाजपच्याच आमदारांनी माझ्याकडे गाऱ्हाणे मांडले आहे की, जिल्ह्यातील पालकमंत्री त्यांना विकासकामांसाठी निधी देत नाहीत. पंकजा मुंडे जालन्यातही ‘परळी पॅटर्न’ राबवत असून, केवळ आपल्या नातेवाईकांना आणि सगे-सोयऱ्यांना निधी वाटप करत आहेत. पंकजा मुंडे या अहंकारी आहेत, पण खुनशी नाहीत हे खरे असले, तरी त्यांनी पक्षात अशा प्रकारे स्वतःचे सगे-सोयरे आणू नयेत.” सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा महाराष्ट्राच्या राजकारणासोबतच मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या उपोषणावर आणि पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त केला. दिल्लीतील परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले की, “सोनम वांगचूक यांचे आंदोलन पूर्णपणे शांततेच्या आणि लोकशाहीच्या मार्गाने सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पदावरून बाजूला झाले पाहिजे. हे सरकार सुरुवातीपासूनच जनतेचा आवाज आणि आंदोलने दडपण्याचे हुकूमशाही काम करत आले आहे. आमचा सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असून देशातील प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. सरकार आंदोलकांना ताब्यात घेऊ शकते, पण त्यांच्या विचारांना कधीही बेदखल करू शकत नाही.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.