
राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या अधिकृत ‘लोकराज्य’ मासिकात एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या मासिकात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आणि त्यांना मिळालेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा फोटो चक्क उलटा छापण्यात आला आहे. या चुकीचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत उमटले. विरोधकांनी या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी विरोधकांच्या आक्रमकतेची गंभीर दखल घेत, दोषींवर पुढील २४ तासांच्या आत कडक कारवाई केली जाईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली आहे. नेमका काय आहे प्रकार? महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकराज्य’ मासिकाचा दर्जा आणि त्यातील माहिती अत्यंत अचूक असणे अपेक्षित असते. मात्र, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अंकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेबाबत निष्काळजीपणा करण्यात आल्याचे समोर आले. मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आणि त्याचसोबत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ पुरस्काराचा फोटो देखील उलटा छापण्यात आला. विधानसभेत गदारोळ विधीमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा सभागृहात अत्यंत आक्रमकपणे लावून धरला. “महामानवांचा असा अवमान राज्य सरकार कधीपर्यंत सहन करणार?” असा सवाल करत विरोधकांनी अध्यक्षांच्या समोरील जागेत येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गंभीर प्रकरणावर सरकारने सभागृहात तात्काळ अधिकृत निवेदन करावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली. यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले होते. २४ तासांत कारवाईची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा सभागृहातील वाढता गदारोळ आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी स्वतः यावर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र खेद व्यक्त करत सरकार अशा चुकांचे कधीही समर्थन करणार नाही, असे स्पष्ट केले. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत आहेत. शासकीय मासिकात असा निष्काळजीपणा आणि एवढी मोठी चूक अत्यंत अक्षम्य आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, जे अधिकारी किंवा कर्मचारी यासाठी जबाबदार असतील, त्यांच्यावर पुढील २४ तासांच्या आत कडक कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले. हेही वाचा.. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या दिशेने मोठे पाऊल, मुख्यमंत्र्यांकडून 7 सदस्यीय समितीची घोषणा महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तेरावा दिवस आहे. दोन्ही सभागृहांच्या विशेष कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजच्या 14 व्या दिवशी विधानसभेत ‘लक्षवेधी’च्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी जनतेच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. आज विधीमंडळात अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जाणार असून, विरोधक विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे, काल विधीमंडळात मुंबईतील पूरस्थिती आणि ग्रामीण भागातील स्मशानभूमीच्या विदारक वास्तवतेवर अत्यंत गंभीर चर्चा पाहायला मिळाली. वाचा बातमीचे लाइव्ह अपडेट्स..
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
