
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बुधवार पेठेतील ‘डिस्को’ आणि ‘माचीस’ या इमारतींवर मध्यरात्री छापा टाकत एका मोठ्या वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीसह 15 बांगलादेशी नागरिकांची सुटका करण्यात आली. एकूण 18 जणांना ताब्यात घेण्यात आले असून, यात 11 महिला, 3 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. ही मोहीम सोमवारी रात्री 11.30 वाजता सुरू होऊन मंगळवारी पहाटे 5 वाजेपर्यंत चालली. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बुधवार पेठेतील या दोन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर अनैतिक मानवी व्यापार आणि वेश्याव्यवसाय सुरू होता. ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी 15 जण मूळचे बांगलादेशातील रहिवासी आहेत. यामध्ये बोर्ना खानुम (प्रियंका), सोमैय्या अख्तर, रय्या प्रवीण, पारुल खातून, लवली खातून, रुना शेख, तस्लिमा शेख यांसारख्या महिलांचा समावेश आहे, ज्या देहविक्रीच्या व्यवसायात गुंतल्या होत्या. या कारवाईत 15 वर्षे 4 महिने वयाच्या एका अल्पवयीन मुलीचीही सुटका करण्यात आली, जिला बळजबरीने या व्यवसायात ढकलण्यात आले होते. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, या बांगलादेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही अधिकृत कागदपत्रे नाहीत. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमित मिलिंद चव्हाण (रा. मंगळवार पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या व्यवसायावर देखरेख ठेवणारी ‘अक्का’ उर्फ ज्योती (सबिना अस्लम शेख) आणि समीर मुस्तफा हलवदार व राहुल वीरेंद्र शर्मा या दोन मॅनेजर्सनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या सर्वांचे मोबाइल फोन आणि हिशोबाच्या डायऱ्या जप्त केल्या आहेत. या डायऱ्यांमधून या व्यवसायाचे जाळे कोठपर्यंत पसरले आहे, याचा तपास केला जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकांमध्ये महिलांव्यतिरिक्त मोहीदुल शेख आणि सोझोल आलम फकीर या पुरुषांचाही समावेश आहे. पुणे पोलिस आता मानवी तस्करी आणि पासपोर्ट कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






