
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील शेतकरी खेमचंद फुले यांनी मोसंबी पिकाला मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे आपल्या शेतातील ४५० मोसंबीच्या ओल्या झाडांवर जेसीबी चालवून संपूर्ण बाग उद्ध्वस्त केली. २०२१ मध्ये एक हेक्टर क्षेत्रावर मोठ्या अपेक्षेने मोसंबीची लागवड करण्यात आली होती. मात्र चार वर्षे सतत पाणी, खत, औषधे, मजुरी आणि देखभालीवर लाखो रुपये खर्च करूनही बाजारात मोसंबीला केवळ १५ ते २० रुपये प्रतिकिलो दर व यावर्षी तर फक्त ८ रुपये किलोने मोसंबी विकण्याची नामुष्की त्यांच्यावर आली. बाजारात कमी दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले होते. अखेर आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घ्यावा लागल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. खेमचंद फुले यांनी सांगितले की, मोसंबी बाग उभी करण्यासाठी सुरुवातीच्या काळात ठिबक सिंचन, रोपे, कुंपण, औषध फवारणी, पाणी व्यवस्थापन यावर मोठा खर्च झाला. गेल्या चार वर्षांत हवामानातील सततच्या बदलांमुळे रोगराई आणि फळगळ यांचाही सामना करावा लागला. त्यातूनही उत्पादन चांगले आले; मात्र बाजारात व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दर देण्यात येत असल्याने शेती करणे परवडेनासे झाले. सध्या रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी, वीज आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. मोसंबी तोडणीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने मजुरीचे दरही वाढले आहेत. अशा परिस्थितीत १५ ते २० रुपये किलो व यावर्षी ८ रु किलो दराने माल विकल्यानंतर हातात काहीच राहत नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली. अनेक वेळा बाजार समित्यांमध्ये माल नेण्यासाठी लागणारा वाहन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मोसंबी पिकाला हवामान बदलाचाही फटका गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, वाढते तापमान आणि पाण्याची टंचाई यामुळे फळबागांना मोठा फटका बसत आहे. मोसंबी बाग टिकवण्यासाठी नियमित सिंचन आवश्यक असते. मात्र विजेचे वाढते बिल आणि पाण्याची कमतरता यामुळे बाग सांभाळणे कठीण होत चालले आहे. तज्ज्ञांच्या मते, उत्पादन वाढत असताना बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगांचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
