रोहित पवारांचा ‘ऑपरेशन टायगर’वर मोठा बॉम्ब!: फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला! – Dharashiv News

रोहित पवारांचा ‘ऑपरेशन टायगर’वर मोठा बॉम्ब!:  फुटलेल्या खासदारांना 80-90 कोटी कॅश आणि 250 कोटींचा निधी; ओमराजेंनाही लगावला टोला! – Dharashiv News



शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील 9 पैकी तब्बल 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वरून राजकारण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) युवा आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. “ऑपरेशन टायगरच्या नावाखाली फुटलेल्या प्रत्येक खासदाराला 80 ते 90 कोटी रुपये कॅश आणि अडीचशे कोटी रुपयांचा विकास निधी देण्यात आला आहे,” असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, धाराशिवमधील सभेत त्यांनी खोटी शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन बाजार’ धाराशिव येथे पत्रकारांशी बोलताना रोहित पवार यांनी शिंदे गटाच्या ‘ऑपरेशन टायगर’ची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “खासदार असेच गोडीत फुटलेले नाहीत. आम्हाला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 60 ते 90 कोटी रुपये कॅश आणि दरवर्षी अडीचशे कोटींचा विकास निधी प्रत्येक खासदाराला दिला जाणार आहे. या विकास निधीतून 15 ते 20 टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरकडून घेतली जाईल आणि त्यातून तो निधी मिळणार आहे. हे सर्व नेते फक्त पैशासाठी गेले आहेत. हे कोणतेही ‘ऑपरेशन टायगर’ नसून डी-लिमिटेशनसाठी भाजपने मांडलेला हा ‘ऑपरेशन बाजार’ आहे.” भाजपमधील अंतर्गत कलहावर रोहित पवार म्हणाले, “राज्यातील आणि केंद्रातील भाजपमध्ये सध्या वाद सुरू आहे. केंद्रातील भाजप एकनाथ शिंदे यांना बळ देत आहे, तर राज्यातील भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ताकद देत आहे. यामुळेच फडणवीस हे एकनाथ शिंदे यांची अडवणूक करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आर्थिक बळ लावल्यामुळेच हे खासदार फुटले असावेत,” असा दावाही त्यांनी केला. “भाजपला अजून 40 खासदारांची गरज आहे, पण ते मिळतील असे वाटत नाही. 2029च्या लोकसभेला आपण निवडून येणार नाही, हे माहीत असल्याने खासदार फोडून डी-लिमिटेशन करण्याचा भाजपचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.” ‘ऑपरेशन तुतारी’ची हवा; पण एकही आमदार-खासदार फुटणार नाही! शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरनंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’ राबवले जाणार असून शरद पवार गटाचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर ठामपणे उत्तर देताना रोहित पवार म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षातून आमचा कोणताही आमदार किंवा खासदार फुटणार नाही. ही केवळ चर्चा आहे,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. ओमराजे निंबाळकरांवर अप्रत्यक्ष निशाणा, “काही लोक खोटी शपथ घेतात” यानंतर धाराशिव येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना रोहित पवार यांनी शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले स्थानिक नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. तसेच, नाव न घेता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावरही प्रहार केला. रोहित पवार म्हणाले, “मी शपथ घेऊन सांगतो की आम्ही खोटी शपथ कधीच घेत नाही. तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन आपण वर्षभर लढायची प्रेरणा घेतो, पण या भागामध्ये काही लोक आईची खोटी शपथ घेऊन फुटत असतील, विचार बदलत असतील, तर ते लोकांना पटणार नाही.” त्यांनी ओमराजे निंबाळकरांकडे अंगुलीनिर्देश केल्याची चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवार पुढे म्हणाले, “या जिल्ह्यात आजपर्यंत ‘तू मार, मी रडतो; मी मारतो, तू रड’ असे दोन भावांचे राजकारण चालले आहे. या दोन परिवारांच्या राजकारणाच्या नादात हे परिवार मोठे झाले, पण हा जिल्हा मात्र गरीब राहिला. पण येत्या 2029 मध्ये लोक सामान्य परिवारातल्या उमेदवाराला नक्की ताकद देतील. लोकांनी त्यांना हिरो बनवलं होतं, पण आता विचारांची आणि भूमिकेची अदलाबदल केल्यामुळे तेच नेते लोकांसमोर झिरो झाले आहेत.” शेतकरी कर्जमाफीत फसवणूक; मंत्री गप्प का? राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेवरही त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “योजनेत 2019ची अट टाकून सरकारने जाहीर केलेल्या आकड्यापेक्षा कितीतरी कमी पैसे शेतकऱ्यांना देण्याची छुपी रणनीती आखली आहे. मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत ही नोट ठेवली गेली. मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व मंत्र्यांनी ती वाचली, पण कुणीही याविरुद्ध आवाज उठवला नाही किंवा राजीनामा दिला नाही,” असा आरोप रोहित पवार यांनी केला. भूमिका बदलायची नाही; जेलमध्ये जायचीही तयारी ईडीच्या (ED) कारवाईचा संदर्भ देत रोहित पवार म्हणाले की, “जेव्हा माझ्यावर इडीची कारवाई झाली, तेव्हा मी जेलमध्ये जाऊन आलेल्या लोकांशी बोललो होतो. घरचं जेवण कसं खायचं, पेपर कसा वाचायचा याची माहिती घेतली होती. कारण मला अटक होऊ शकते हे मला माहीत होतं. पण काहीही झाले तरी भूमिका आणि बाजू बदलायची नाही, हे मी ठरवले होते. कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही घाबरत नाही. लोकांसाठी जेलमध्ये जाण्याचीही आमची तयारी आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, अधिवेशनात मविआची एकजूट कमी दिसत असल्याच्या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “29 तारखेला आमच्या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचेही नेते सहभागी होतील. आमच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. अधिवेशनातही आगामी काळात आमची एकजूट नक्कीच दिसेल आणि आम्ही आक्रमकपणे लोकांची बाजू मांडू.”

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
error

Enjoy this blog? Please spread the word :)

YouTube
YouTube
Instagram
WhatsApp