
पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वारकऱ्यांना पिण्यासाठी गढूळ पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करत, विरोधकांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. “जनतेच्या करातून जमा झालेला पैसा जाहिरातींवर उधळला जातोय, पण वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या नावाने मृत्यूचा सापळा रचला जात आहे,” अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले आहे. वारीच्या मार्गावर वारकऱ्यांना शुद्ध पाणी मिळणे ही मूलभूत गरज असताना, तिथे गढूळ पाणी पुरवले जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, “वारकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारने कोणताही विलंब न लावता, तातडीने वारी मार्गावर शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, ही माझी कळकळीची विनंती आहे.” सरकारला टोला लगावताना ते पुढे म्हणाले, “सरकारने तातडीने वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवण्याच्या सूचना द्याव्यात ही विनंती आणि कुणी गढूळ पाणीपुरवठा केल्यामुळं सरकारवर टीका केली तर कृपया त्यांच्यावर महाराष्ट्राचा अवमान करत असल्याचा आरोप करु नये!” असे रोहित पवार म्हणालेत. जाहिरातींची उधळपट्टी आणि वारीतील गैरसोयी काँग्रेसने या मुद्द्यावरून सरकारवर थेट निशाणा साधला आहे. “महायुती सरकार सध्या स्वतःच्या जाहिरातींसाठी जनतेच्या पैशांची कोट्यवधींची उधळपट्टी करत आहे. जर सरकारकडे जाहिरातींसाठी एवढा निधी असू शकतो, तर वारीसारख्या पवित्र सोहळ्यात वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत?” असा संतप्त सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. वारीतील सोयी-सुविधांचा अभाव म्हणजे थेट वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ असल्याची टीकाही विरोधकांकडून केली जात आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सरकार तत्पर असते, पण प्रत्यक्ष मैदानात वारकऱ्यांना दुषित पाणी प्यावे लागत असेल, तर ही प्रशासकीय अपयशाची कमाल असल्याचे मत व्यक्त होत आहे. भक्तांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष का? दरम्यान, लाखो भाविक आपल्या श्रद्धास्थानाच्या दर्शनासाठी ऊन-वारा-पावसाची पर्वा न करता वारीत सहभागी होतात. अशा वेळी प्रशासनाकडून पुरवण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य नसणे, हे साथीच्या रोगांना आमंत्रण देण्यासारखे आहे. वारकरी संप्रदायाचा मोठा ओढा असतानाही, त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांवर सरकारकडून होणारी ही हेळसांड येणाऱ्या काळात मोठी दुर्घटना घडवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. आता या आरोपानंतर सरकार तातडीने कोणती पावले उचलते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
