धोंड्याच्या महिन्यातच मेहुण्याने भाऊजीचा काढला काटा!: 3 लाखांची दिली होती सुपारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार – Kolhapur News

धोंड्याच्या महिन्यातच मेहुण्याने भाऊजीचा काढला काटा!:  3 लाखांची दिली होती सुपारी, कवठेमहांकाळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार – Kolhapur News



सध्या सर्वत्र धोंड्याचा महिना साजरा होत असून, परंपरेनुसार गावोगावी जावयाचे आणि भाऊजींचे मोठ्या थाटात लाड केले जात आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे या परंपरेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विम्याच्या तब्बल 30 लाख रुपयांच्या रकमेवर डोळा ठेवून सख्ख्या मेहुण्यानेच आपल्या भाऊजींचा काटा काढला आहे. या खळबळजनक गुन्ह्यासाठी त्याने मारेकऱ्यांना तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती आणि ही हत्या अपघात वाटावा अशा पद्धतीने घडवून आणली होती. सुरुवातीला या घटनेची पोलिस दप्तरी अपघाती मृत्यू म्हणूनच नोंद करण्यात आली होती. परंतु, तपासादरम्यान पोलिसांना या अपघाताविषयी संशय आल्याने त्यांनी अधिक बारकाईने चौकशी केली. या सखोल तपासाअंती, केवळ विम्याचे 30 लाख रुपये लाटण्यासाठी 3 लाखांची सुपारी देऊन हा खून केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली) आणि तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) या दोन आरोपींना अटक केली असून, पैशांच्या लालसेपोटी नात्यांचाच खून झाल्याचे यातून उघडकीस आले आहे. नेमके काय घडले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 मे 2026 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर चोरोची गावातील प्रेम ढाब्याजवळ दत्तात्रय भगवान चावरे (वय 44, रा. अभयनगर, सांगली) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरुवातीला हा निव्वळ अपघात असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, घटनास्थळाचा पंचनामा, शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय निष्कर्षांमधून त्यांच्या डोक्यावर जबर मारहाण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय बळावला आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाला सुरुवात केली. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलिसांनी रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. विश्रामबाग, सांगली) आणि तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव, ता. जत) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, आर्थिक व्यवहाराच्या वादातून दत्तात्रय चावरे यांच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मारेकऱ्यांनी आधी मारहाण करून चावरे यांचा खून केला आणि त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी हा केवळ अपघात असल्याचे भासवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे तपासाअंती निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल करत आरोपींना बेड्या या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चोरोची गावाजवळ घडलेल्या या खळबळजनक गुन्ह्याचा यशस्वी उलगडा करण्यात कवठेमहांकाळ पोलिसांना यश आले असून, ही धडक कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्यासह पो.हे.कॉ. श्रीमंत करे, नागेश मासाळ, हवालदार निवृत्ती कारंडे, अभिजित कटार, स्वप्नील पाटील तसेच सायबर पोलिस ठाण्यातील विजय पाटणकर आणि कॅप्टन गुंडवाडे यांच्या विशेष पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गुन्ह्याचा अचूक छडा लावला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp