
नागपूर शहर पोलिसांनी ‘ड्रग्समुक्त नागपूर-सुरक्षित नागपूर’ या ध्येयाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन थंडर २.०’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या अडीच वर्षांत २३.२१ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, १,५१५ तस्करांना अटक करण्यात आली आहे. कठोर कायदेशीर कारवाई, व्यापक जनजागृती आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे ही मोहीम प्रभावी ठरली आहे. २०२४ पासून १८ जून २०२६ पर्यंतच्या कालावधीत पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण १,१६८ गुन्हे नोंदवले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ७.३२ कोटी रुपयांचा १,५६७ किलो गांजा आणि १५.५८ कोटी रुपयांचे सुमारे १७ किलो मेफेड्रोन या सिंथेटिक ड्रग्सचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, चरस, ब्राऊन शुगर आणि एलएसडीसारख्या इतर घातक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे. अमली पदार्थांचा अवैध व्यापार समूळ नष्ट करण्यासाठी पोलिसांनी ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ अवलंबली आहे. या धोरणांतर्गत चार मोठ्या संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच, दोघांवर ‘पिट-एनडीपीएस’ अंतर्गत कारवाई झाली असून, आणखी पाच प्रस्ताव सध्या प्रक्रियेत आहेत. ही मोहीम केवळ कारवाईपुरती मर्यादित नसून, ती एका मोठ्या लोकचळवळीत रूपांतरित झाली आहे. गेल्या दोन वर्षांत पोलिसांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये ८५० हून अधिक जनजागृती कार्यक्रम घेतले, ज्यात १.४४ लाखांहून अधिक नागरिक थेट सहभागी झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून ५० लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत ‘ड्रग्सला नाही म्हणा, जीवनाला होकार द्या’ हा संदेश पोहोचवण्यात आला आहे. शहरातील ३४ चित्रपटगृहांमध्ये दररोज पाच शोद्वारे लाखो प्रेक्षकांपर्यंत हा संदेश प्रभावीपणे प्रसारित करण्यात आला. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, शहरात कुठेही अमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास ‘ऑपरेशन थंडर हेल्पलाईन’ ७०५७०६७४०० या क्रमांकावर तत्काळ संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या नागरिकांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
