
पुण्यातील भाजपच्या अंतर्गत राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, दोन नगरसेविकांमधील वाद आता थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्याविरोधात खडक पोलिस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भाजपच्याच दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून करण्यात आली असून, या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या काळापासून पाटील आणि कांबळे कुटुंबांमधील राजकीय वितुष्ट विकोपाला गेले असून, आता त्याचे रूपांतर थेट कायदेशीर संघर्षात झाले आहे. बापू कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत असा आरोप केला आहे की, पाटील दांपत्याने केवळ जातीय द्वेषापोटी निवडणूक कार्यालयावरील बॅनर फाडले, कार्यकर्त्यांना धमकावले आणि विजयानंतरही घरासमोरील बॅनरवरून मुद्दाम वाद उकरून काढला. अर्चना पाटील या एका विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वक लक्ष्य करत असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. मात्र या वादाला दुसरी बाजूही असून, यापूर्वी अर्चना पाटील यांनीही मृणाल कांबळे यांच्याविरोधात पोलिस आयुक्तांकडे दाद मागितली होती, ज्यामुळे या दोन्ही भाजप नगरसेविकांमधील अंतर्गत कलह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, पुण्यातील भाजपच्या अंतर्गत वादाची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही बाणेरमधील एका वसतिगृहाच्या कामावरून आणि त्यातील टक्केवारीवरून माजी नगरसेविका राजश्री काळे आणि विद्यमान नगरसेविका रोहिणी चिमटे यांच्यात झालेली तुफान खडाजंगी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. तो वाद अजून ताजा असतानाच, आता नगरसेविका अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला असून, थेट पोलिस तक्रारीपर्यंत मजल गेल्याने पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






