
मुंबईत मुसळधार पावसात थेट महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यांदेखत एक नागरिक उघड्या मॅनहोलमध्ये कोसळल्याच्या धक्कादायक घटनेनंतर आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरून महापौर आणि सत्ताधारी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. “सध्याच्या महापौरांना मुंबईत काय चाललंय, यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय यात जास्त रस आहे,” असा खोचक टोला लगावत आदित्य ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले. प्रशासनाच्या आणि कंत्राटदारांच्या भ्रष्ट कारभारामुळेच मुंबईची ही अवस्था झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मुंबई किंवा देशात ‘पाऊच’ हाच खरा अर्थमंत्री आहे, असे म्हटले जाते. गेल्या तीन-चार महिन्यांत यांचे ‘हा नाला साफ केला’, ‘तो नाला साफ झाला’ असे दावे करणारे केवळ फोटो समोर आले होते. ज्या कंत्राटदारांना पालिकेने आधी काळ्या यादीत टाकले होते, त्यांनाच पुन्हा अंतर्गत कंत्राटे देण्यात आली. हे सगळे घोळ घालून ठेवल्यामुळेच आज थेट महापौरांच्या समोर मॅनहोलमध्ये एक निष्पाप व्यक्ती पडली.” ते पुढे म्हणाले, “भाजप आणि महापौर यांना कधी मुंबईची काळजी नव्हतीच. त्यांना केवळ कंत्राटदार आणि बिल्डरांची काळजी आहे. पण ज्यांच्याबद्दल तुम्हाला इतकी काळजी आहे, त्यांनी कामे तरी कशी केली, याची तरी किमान काळजी घ्यायला हवी होती.” ना पाणी सांभाळता आले, ना पाऊस! मुंबईतील पाणीटंचाई आणि त्यानंतर उद्भवलेल्या तुंबलेल्या परिस्थितीवरून आदित्य ठाकरेंनी महापौरांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “गेले एक-दीड महिना मुंबईत पाण्याचे टँकर अचानक वाढले होते. पालिकेने अधिकृतपणे १० टक्के पाणी कपात जाहीर केली असली, तरी प्रत्यक्षात मुंबईकरांना ४० ते ५० टक्के पाणी कपातीचा सामना करावा लागत होता. अनेक भागांत पाण्याचा दाब अत्यंत कमी होता.” मुंबईला बुडवून दाखवले “आधी मुंबईकरांना पाण्यासाठी तरसवले आणि आता अचानक पाऊस आल्यावर महापौरांसमोरच माणूस मॅनहोलमध्ये पडला. म्हणजे तुम्हाला धड पाण्याची टंचाईही सांभाळता येत नाही आणि आलेला पाऊसही सांभाळता येत नाही. आज तुम्ही मुंबईला बुडवून दाखवले, हेच सत्य समोर आले आहे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. पाहणी दौऱ्यातून काय साध्य झाले? मुंबईच्या लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत वादावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद सुरू होते ते संपूर्ण जनतेने पाहिले आहेत. पण वाद बाजूला ठेवून त्यांनी जे पाहणी दौरे केले, त्या दौऱ्यांमधून नक्की काय साध्य झाले, हे अद्याप मुंबईकरांना समजलेले नाही. कायदा सुव्यवस्थेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा “केवळ मुंबईच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेच गृहमंत्री असूनही परिस्थिती अत्यंत भीषण आणि गंभीर बनली आहे. आज विधिमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी जनतेच्या हिताचे औचित्याचे मुद्दे मांडले, अनेकजण बोलत आहेत; पण या सरकारमध्ये आमदारांच्या मागण्यांची नोंद तरी कोण घेतंय?” अशी तीव्र खंत त्यांनी व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
