
अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी आज, शनिवारी सकाळी झोन क्रमांक २ अंतर्गत विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी नाले, उद्याने, परिसराची स्वच्छता, अतिक्रमणाची स्थिती आणि नागरी सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्याची सुरुवात गर्ल्स हायस्कूल चौकातून झाली. आयुक्तांनी पायी फिरून संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाला भेट देऊन त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि परिसराची पाहणी केली. पुढे, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आतील परिसराची पाहणी करून सांडपाणी व्यवस्थापन व इतर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मालवीय चौकातील नाल्याची पाहणी करताना, नाल्यात कचरा टाकणाऱ्या हॉकर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जयस्तंभ चौक परिसरात घुमंतूंवर नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चौधरी चौक रोडवरील साचलेला कचरा त्वरित उचलण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. राजकमल आणि गांधी चौक परिसर स्वच्छ, सुंदर व व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधितांना देण्यात आल्या. त्यानंतर आयुक्तांनी प्रशांत नगर येथील उद्यानाला भेट दिली. त्यांनी उद्यानातील विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. नागरिकांसाठी हे उद्यान अधिक चांगले व आकर्षक करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. आयुक्तांनी महानगरपालिकेच्या नर्सरीलाही भेट दिली. तेथील उपलब्ध झाडे, रोपे आणि वृक्षारोपणाच्या नियोजनाची माहिती त्यांनी जाणून घेतली. शहरातील हरित क्षेत्र वाढवण्यासाठी उपलब्ध रोपांचा योग्य वापर करून नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या पाहणी दौऱ्यात शहर सुधार समिती सभापती राधा कुरील, विधी समिती सभापती स्नेहा लुल्ला, शिक्षण समिती सभापती प्रीती रेवणे, नगरसेवक मिलिंद बांबल, मनीष बजाज, प्रदीप हिवसे, स्मिता सूर्यवंशी, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, उपअभियंता दिनेश हंबर्डे, बाजार परवानाचे मंगेश कडू, स्वास्थ अधीक्षक विजय बुरे, शहर समन्वयक श्वेता बोके, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक श्रीकांत डवरे, स्वच्छता निरीक्षक तसेच उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या दौऱ्यात आयुक्तांनी प्रसिद्ध नेहरू मैदानाचीही पाहणी केली. मैदानावर मोठ्या प्रमाणात कचरा आणि परिसरात घुमंतू आढळून आले. त्यांनी कचरा हटवण्याच्या सूचना दिल्या, तसेच घुमंतूंवर नियमानुसार कारवाई करून परिसरात शिस्त व स्वच्छता राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.