
गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी रुग्णालयात देखील नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला. घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम कांदोळी गावात एका महिलेने घरगुती वादातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला दोन तरुणांनी दुचाकीवर बसवून अत्यंत कठीण परिस्थितीत बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. दरम्यान, एका सतर्क नागरिकाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वसूचना दिली, ज्यामुळे तिला वेळेत वैद्यकीय मदत मिळणे सुलभ झाले. रुग्णवाहिका मिळाली, पण चालक सुट्टीवर बुर्गी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले, मात्र महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात हलवणे गरजेचे होते. त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक उपलब्ध नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली असता, तिथे उपस्थित असलेल्या एका कर्तव्यदक्ष नागरिकाने स्वतः रुग्णवाहिका चालवत त्या महिलेला वेळेत एटापल्ली येथे पोहोचवून मोलाची मदत केली. खड्डेमय रस्त्यांमुळे रुग्णालयात पोहोचण्यास उशीर खराब आणि खड्डेमय रस्त्यांमुळे प्रवासात झालेला विलंब अखेर या महिलेच्या जीवावर बेतला, ज्याचा थेट परिणाम वेळेवर मिळणाऱ्या उपचारांवर झाला. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान तिची ऑक्सिजन पातळी सतत खालावत गेल्याने अखेर तिचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधांची वानवा, रुग्णवाहिकेची अनुपलब्धता आणि रस्त्यांची दुरवस्था यांसारख्या ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. आरोग्य विभागाचे स्पष्टीकरण या प्रकरणावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले असून, 4 मे 2026 रोजी कांदोळी येथील संबंधित महिलेने ‘ऑर्गॅनोफॉस्फरस’ (OP) विष प्राशन केल्याचे नमूद केले आहे. मात्र, या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी स्थानिक कांदोळी उपकेंद्र किंवा बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा त्यांच्याशी संपर्क साधला नव्हता. आरोग्य विभागाशी संपर्क न साधता नातेवाईकांनी स्वतःहून पुढाकार घेत रुग्णाला परस्पर दुचाकीवरून बुर्गी येथे नेण्याचा निर्णय घेतल्याचा खुलासा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या खुलाशानुसार, संबंधित रुग्ण सकाळी 10.50 वाजता बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाला असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तातडीने प्राथमिक उपचार करून रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता तिला उच्चस्तरीय उपचारांसाठी एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात संदर्भित केले. नियमित रुग्णवाहिका चालक रजेवर असूनही प्रशासनाने तत्काळ पर्यायी व्यवस्था करून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. मात्र, विषबाधेची तीव्रता प्रचंड असल्याने एटापल्ली येथे उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने या महिलेचा मृत्यू झाला. प्रशासन जबाबदार नाही – जिल्हा आरोग्य अधिकारी या प्रकरणावर अधिकृत भूमिका मांडताना गडचिरोली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले की, आरोग्य विभागाने उपलब्ध संसाधनांचा वापर करून रुग्णाला योग्य वेळी प्रतिसाद दिला आणि पुढील उपचारांसाठी संदर्भित केले. नातेवाईकांनी सुरुवातीला आरोग्य केंद्राशी संपर्क न साधता रुग्णाला परस्पर दुचाकीवरून नेल्यामुळे प्रवासात जो प्राथमिक विलंब झाला, त्याला प्रशासन जबाबदार नसल्याचे त्यांनी सूचित केले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतरचा पुढील संपूर्ण प्रवास शासकीय रुग्णवाहिकेद्वारेच करण्यात आला होता, असेही त्यांनी या वेळी ठामपणे नमूद केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






