
आषाढी वारीला भक्तिभावाचे उधाण आले असून श्री संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी सोमवारी (२९ जून) त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरच्या दिशेने मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली. ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’, ‘राम कृष्ण हरी’ या अखंड नामघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भगव्या पताकांनी सजलेल्या वातावरणात हजारो वारकऱ्यांनी पालखीला निरोप दिला. यंदा 60 दिंड्यांसह हजारो भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी झाले असून तब्बल 26 दिवसांचा प्रवास पूर्ण करून पालखी 24 जुलै रोजी पंढरपूरात दाखल होणार आहे. त्र्यंबकनगरीत भक्तीचा महासागर सोमवारी सकाळपासूनच संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. कपाळी गंध-बुक्का, डोक्यावर तुळशीचे रोप, हातात टाळ-मृदंग आणि मुखी विठ्ठल-निवृत्तिरायांचा अखंड नामजप करत वारकरी मोठ्या उत्साहाने पालखी सोहळ्यात सहभागी झाले. दुपारी सुमारे १२ वाजता नारळ प्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. सजवलेले अश्व, भगव्या पताका, नगाऱ्यांचा गजर आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसर भक्तिमय झाला. कुशावर्त तीर्थावर पादुकांना जलाभिषेक, त्र्यंबकराजांची भेट पालखी प्रस्थानापूर्वी संत निवृत्तिनाथांच्या पादुकांचा कुशावर्त तीर्थावर जलाभिषेक आणि महापूजा नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे व त्यांचे पती, माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरात पोहोचली. येथे भगवान त्र्यंबकराज आणि संत निवृत्तिनाथ महाराजांची प्रतीकात्मक भेट घडली. मंदिर परिसरात वारकऱ्यांनी अभंगसेवा सादर केली, फुगड्या खेळल्या आणि भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला. 230 किलो चांदीने सजलेला दीड कोटींचा रथ ठरला आकर्षण यंदाच्या पालखी सोहळ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे संत निवृत्तिनाथ महाराजांचा भव्य रथ. शिसवी लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या रथावर सुमारे 230 किलो चांदीच्या पत्र्यावर नक्षीकाम करण्यात आले आहे. या रथासाठी जवळपास दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून तो सात वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. या रथात संतांच्या चांदीच्या मूर्ती आणि पादुका विराजमान करण्यात आल्या आहेत. यंदा सुरक्षेच्या दृष्टीने रथात सीसीटीव्ही यंत्रणाही बसवण्यात आली आहे. 60 दिंड्यांसह 26 दिवसांचा प्रवास पालखीसोबत 60 दिंड्या सहभागी झाल्या असून हजारो वारकरी अभंग, कीर्तन, भजन आणि आरती करत पंढरपूरकडे निघाले आहेत. पालखीचा पहिला मुक्काम पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यात असलेल्या गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी झाला. पुढील 26 दिवस वारकरी महाराष्ट्रभरातून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणार आहेत. मंत्री गिरीश महाजन, अमित ठाकरेंसह अनेक मान्यवरांची उपस्थिती पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार हिरामण खोसकर, विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते, तसेच मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनीही उपस्थित राहून दर्शन घेतले. याशिवाय मोहन महाराज बेलापूरकर, बाळासाहेब देहूकर, संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष राहुल साळुंखे, सचिव श्रीपाद कुलकर्णी, पालखी सोहळा प्रमुख माधवदास राठी महाराज यांच्यासह सर्व विश्वस्त आणि पुजारी उपस्थित होते. मार्ग बदलल्याने नव्या भागात जल्लोष; ठिकठिकाणी पुष्पवृष्टी यंदा पालखीच्या प्रस्थान मार्गात बदल करण्यात आला. त्यामुळे चौकीमाथा आणि तेलीगल्ली परिसरातून प्रथमच पालखी गेल्याने स्थानिक नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले. मार्गभर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या, तर अनेक ठिकाणी घरांच्या गच्च्यांवरून आणि बाल्कनीतून भाविकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. व्हीआयपी वाहनांमुळे नियोजन विस्कळीत; प्रशासनावर टीका पालखी प्रस्थानावेळी मंदिर परिसरात गर्दी टाळण्यासाठी खासगी वाहनांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र विविध मान्यवरांचे ताफे, राजकीय नेते आणि आखाड्यांच्या वाहनांमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. परिणामी पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. याशिवाय नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले असले तरी ते ऐनवेळी करण्यात आल्याने प्रशासनावरही टीका झाली. २४ जुलैला पंढरीत आगमन संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी आता कीर्तन, भजन, अभंग आणि नामस्मरण करत महाराष्ट्रभरातील विविध गावांमधून मार्गक्रमण करणार आहे. हजारो वारकऱ्यांच्या सोबतीने हा भक्तिमय सोहळा २४ जुलै रोजी पंढरपूरात पोहोचणार असून त्यानंतर आषाढी वारीचा मुख्य सोहळा रंगणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.
