
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात एका 10 वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी जगराम आडे (वय 60) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. घटनेनंतर दोन दिवसांपासून फरार असलेला हा आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता, मात्र स्थानिक गुन्हे शाखा आणि वन विभागाने राबवलेल्या संयुक्त मोहिमेत त्याला आलेगावच्या जंगल परिसरातून जेरबंद करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरातून समाधान व्यक्त होत असून आरोपीला कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी अत्यंत व्यापक स्तरावर सर्च ऑपरेशन राबवले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकाने दोन दिवस सातत्याने घनदाट जंगलात शोधमोहीम सुरू ठेवली होती. अखेर पोलिसांच्या चिकाटीला यश आले असून, वन विभागाच्या तांत्रिक मदतीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले आहे. या गुन्ह्याची पुढील चौकशी आता पोलिस प्रशासनाकडून अधिक वेगाने सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेत, पीडित मुलीचे आई-वडील शेतमजुरीसाठी घराबाहेर गेल्याची संधी साधून 60 वर्षीय शेजाऱ्याने चिमुकलीवर पाशवी अत्याचार केल्याचा आरोप आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हा नराधम वारंवार मुलीवर अत्याचार करत होता, मात्र प्रचंड भीतीपोटी तिने सुरुवातीला कोणालाही काही सांगितले नाही. अखेर आई-वडिलांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला हा भीषण प्रकार कथन केला. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जगराम आडे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता, मात्र पोलिसांनी राबवलेल्या विशेष शोधमोहिमेनंतर त्याला अखेर जंगल परिसरातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार आणि आमदार नितीन देशमुख यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपीला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली होती. लोकप्रतिनिधींचा दबाव आणि पोलिसांच्या चिकाटीमुळे अखेर या नराधमाला बेड्या ठोकण्यात प्रशासनाला यश आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.






