‘हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे’: आझाद मैदानातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिजित दीपके यांच्या लढ्यालाही पाठिंबा – Mumbai News

‘हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे’:  आझाद मैदानातून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, अभिजित दीपके यांच्या लढ्यालाही पाठिंबा – Mumbai News



दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून प्रकृती खालावल्याने सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या जागी आता दिल्लीच्या आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अन्नत्याग आंदोलनाला बसले असून त्यांना दिवसेंदिवस मोठा पाठिंबा मिळत आहे. याच आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत एका आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी वांगचूक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देत ठाकरे यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपावर सडकून टीका केली, तसेच ‘हे सरकार आता घालवले पाहिजे’, असा घणाघातही त्यांनी केला. मुंबईतील आझाद मैदानात आयोजित या आंदोलनाला ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. या आंदोलनस्थळी सोनम वांगचूक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच, याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, मी आताच एक पोस्टर पाहिले. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, असे त्यात लिहिले होते. राजीनामा ही शुल्लक गोष्ट आहे. केंद्रातील मोदी सरकार आपल्याला रोजी रोटी देऊ शकत नाही, रोजगार शिक्षण देत नाही. उत्तर देत नाही. हे सरकार बदलण्याचा लढा सुरू झाला पाहिजे, असे ठाकरेंनी म्हटले आहे. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, धर्मेंद्र प्रधान नको. सरकारच बदलायचे आहे. मी नेतृत्व करायला आलो नाही. नेते व्हा सांगायला आलो आहे. ही आग सरकार बदलेपर्यंत टिकली पाहिजे. सरकार टिकता कामा नये, या आगीत सरकार भस्म झाले पाहिजे. हा लढा फक्त वांगचुक यांचा नाही. तसेच पुढे ते म्हणाले, सत्ता भ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आंदोलनाला सुरुवात करूया, असे आवाहन ठाकरे यांनी केले. सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिले? सोनम वांगचुक यांचे समर्थनार्थ बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिले आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिले, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. बर्फामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी ‘सोलर कॅम्प’ बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम ‘आइस माउंटेन’ ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरवत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही साधला निशाणा संघावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, पाकिस्तानबरोबर भारताने चर्चा केली पाहिजे, असे वक्तव्य संघाच्या होसबळे यांनी केले होते आणि त्यावर मोहन भागवत यांनीही संमती दर्शवली होती. जे लोक आपल्या सैनिकांच्या जीवावर उठले आहेत, त्या पाकिस्तानसोबत चर्चेसाठी हे तयार आहेत. पण जो व्यक्ती आपल्या लष्करासाठी आणि देशासाठी अहोरात्र काहीतरी करतोय, त्याच्याशी मात्र हे सरकार चर्चेला तयार नाही. आज जे काही देशामध्ये सुरू आहे, ते संघाच्या कल्पनेतील ‘हिंदू राष्ट्र’ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजच्या सरकारकडून दडपशाही सुरू उद्धव ठाकरे म्हणाले, अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांना देशभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी त्यांना कोणीही देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटले नव्हते. उलट, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अण्णांशी सन्मानाने चर्चा करण्यासाठी विलासराव देशमुखांना पाठवले होते. मात्र, आजच्या सरकारकडून दडपशाही सुरू असल्याची टीका ठाकरेंनी केली. तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, चादरीने तुम्ही जरी वांगचुक यांचे आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीही लपत नाही. तुमच्या पापांवर आता पांघरूण घालता येणार नाही, तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार आहे. मोदी सरकारने हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, आम्ही सर्व ताकदीने लढायला तयार आहोत, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील दिल्लीत जाऊन आंदोलनस्थळी अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच इतर अनेक संघटनांनी व पक्षांनी अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Doonited Donation and Advertisement

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »